शिधावाटप दुकानदारांवर गुन्हे दाखल
बदलापूरातील शिधावाटप दुकानांमधून धान्य व रॉकेलचा काळाबाजार होण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. याप्रकरणी ६ जानेवारीला शिधावाटप विभागाच्या मुंबईतील भरारी पथकाने बदलापूर पूर्वेला शिरगाव व पश्चिमेला हेंद्रेपाडा येथील शिधावाटप दुकानांवर छापे टाकत काळाबाजार उघडकीस आणला. संबंधित शिधावाटप दुकान मालकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले. मात्र यात स्थानिक शिधावाटप अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संगनमत असल्याचा आरोप होत असल्याने त्यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
बदलापुरात शिधावाटप कार्यालयामार्फत वितरित केल्या जाणाऱ्या धान्य तसेच रॉकेलचा मोठय़ा प्रमाणात काळाबाजार होत असल्याची ओरड अनेक दिवसांपासून होत होती. तसेच यामागे शिधावाटप कार्यालयातील काही अधिकारी व दुकानदार संगनमताने हा प्रकार करत असल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत होता. असे असतानाच बदलापुरात मुंबईतील भरारी पथकाने टाकलेल्या छाप्यात काळाबाजार होत असल्याचे उघड झाले. यात पश्चिमेकडील हेंद्रेपाडा येथे ४ हजार ९८० रुपये किमतीचे १६६ किलो तांदूळ, ४ हजार ६७५ रुपये किमतीचे गहू तसेच एक हजार ४८० रुपये किमतीचे रॉकेल असा एकूण ११ हजार १३५ रुपयांच्या साठय़ाचा अपहार करण्यात आला. तर पूर्वेकडील शिरगाव भागात १८ हजार रुपयांचे तांदूळ व ३२ हजार ७२५ रुपयांचे गहू असा एकूण ५० हजार ७२५ रुपयांच्या धान्यसाठय़ाचा अपहार करण्यात आला. याप्रकरणी अनुक्रमे हेंद्रेपाडा व शिरगाव येथे नियमाप्रमाणे पावती न फाडता स्वत:च्या फायद्यासाठी काळ्याबाजारात विक्री करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने दुकानदार गुलाबराव देशमुख व त्यांच्या दुकानातील नोकर प्रवीण चौधरी यांच्या विरोधात बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात, तर पूर्वेला शिरगाव येथे शिधावाटप दुकानदार चिंतामण आपटे व त्यांच्या दुकानातील नोकर अवधेश अग्रहरी यांच्या विरोधातही बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिधावाटप कार्यालयावर प्रश्नचिन्ह
बदलापुरात शिधावाटप विभागाच्या मुंबईतील भरारी पथकाने प्राप्त झालेल्या माहितीवरून कारवाई केल्यावर अपहार होत असल्याचे निष्पन्न झाले असून याप्रकरणी बदलापुरातील शिधावाटप कार्यालयाच्या शैलीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे संगनमत असल्याखेरीज शिधावाटप दुकानांमधून काळाबाजार होत नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या दुकानदारांवर कारवाई झाली त्याप्रमाणे या अधिकाऱ्यांची चौकशी तरी होणार का? या प्रश्नाला बदलापूर पूर्व व पश्चिम पोलीस ठाण्याच्या पोलिसांनीही दुजोरा दिला आहे.

संबंधित शिधावाटप दुकानादारांवर गुन्हे दाखल करण्याचे काम बदलापुरातील शिधावाटप कार्यालयाकडून करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील चौकशी करण्याचे काम हे पोलिसांचे असून गरज भासल्यास आम्हीही कर्मचाऱ्यांची चौकशी करू.
– सुधीर जोशी, भरारी पथकप्रमुख, मुंबई</strong>