रस्ता रुंदीकरण, उड्डाणपूल आणि शहरातील वेगवेगळ्या विकासकामांच्या निमित्ताने शहरातील हजारो झाडे तोडली जात असून त्यांचे पुनरेपणही व्यवस्थित केले जात नाही. त्यामुळे गेल्या ३० ते ५० वर्षांपूर्वीपासून शहरामध्ये अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या हिरवळीच्या पट्टय़ाला आता ग्रहण लागले आहे. येऊरच्या पायथ्याकडे जाणाऱ्या पोखरण रस्त्यावरील अनेक झाडे तोडून टाकण्यात आली आहे. तर भास्कर कॉलनी येथील अत्यंत गर्द झाडीवर कुऱ्हाड चालवली जात आहे. त्यामुळे या भागामध्ये राहणाऱ्या रहिवाशांना मोठा धक्का बसला आहे. वाहतूक कोंडीची कोणतीही तक्रार नसताना या भागात उड्डाणपूल साकारून महापालिका आणि एमएमआरडीए कोणाची सोय करत आहेत, असा प्रश्न येथील नागरिक करत आहेत.

भास्कर कॉलनी परिसरातील जिजाऊ उद्यानाच्या बाजूची झाडे तोडण्यास सुरुवात झाल्याने आता या भागामध्ये रखरखाट जाणवण्यास सुरुवात झाली आहे. उड्डाणपूल नव्हे तर मेट्रो होणार अशी अफवा पसरली होती, त्यामुळे नागरिकांनी याकडे लक्ष दिले नव्हते. चांगल्या उपक्रमांना येथील नागरिकांचा पाठिंबा असला तरी अनावश्यक उड्डाणपुलासाठी मात्र आमचा विरोध आहे. येथील पक्षी दुरावले आहेत. उड्डाणपुलाबरोबरच त्याखाली गचाळपणाही या भागात वाढण्याची शक्यताआहे. शहरातील हिरवळ नष्ट करून अशी घाण रहिवासी कधीच स्वीकारणार नाहीत.
– सीमा भट, ठाणे</strong>

आम्ही लहानपणापासून या भागात राहतो त्यामुळे येथील झाडांशी आमचे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते आहे. झाडे जगवण्यासाठी ३० ते ४० वर्षे लागता मात्र ही उद्ध्वस्त करण्यासाठी केवळ एक आठवडय़ात ती उद्ध्वस्त केल्याचे पाहून हळहळल्याशिवाय काहीच करता येत नाही. उड्डाणपूल बांधणारी एमएमआरडीए आणि महापालिका प्रशासन अत्यंत ताकदवान असून त्यांच्यासमोर आम्ही नगण्य आहोत. झाडे वाचवूनही जगात विकास होत असतो, मात्र झाडे तोडून केला जाणारा विकास काय कामाचा
-विनायक बापट, ठाणे

शहरातील वनराई किंवा हिरवळ हे शहराच्या फुप्फुसाचे काम करत असे म्हटले जाते. मात्र एकाच वेळी इतक्या मोठय़ा प्रमाणात झाडे तोडल्याने शहराचे पर्यावरणही ढासळण्याची शक्यता आहे. शहराची हवा शुद्ध करणारी यंत्रणा अशी नामशेष होत असल्याचे पाहिल्याने खूप दु:ख होत आहे. या भागात होणाऱ्या विकासामुळे शहराची शांतता भंग होण्याबरोबरच ध्वनिप्रदूषणाचा प्रश्नही निर्माण होणार आहे.
– सुरेंद्र दिघे, ठाणे

प्रशासकीय यंत्रणांचे आततायीपणा आणि लोकप्रतिनिधींचे पर्यावरणाकडे दुर्लक्षाची भावना यामुळे अत्यंत हिरवळीने नटलेला परिसर उजाड होऊ लागला आहे. पुनरेपण हा प्रकारही अत्यंत चुकीचा असून त्याची शास्त्रीय पद्धतही अवलंबली जात नाही. एखादे सावली देणारे झाड नष्ट झाल्यानंतर तेथे येणाऱ्या पक्षी, प्राण्यांच्या जीवनाप्रमाणेच माणसाचे जीवनही उद्ध्वस्त होते. शहरातील आवश्यक ठिकाणी विकास नाही तर अनावश्यक ठिकाणी पूल बांधले जात आहेत.
– श्रीपाद आगाशे, ठाणे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महात्मा गांधी रस्त्याच्या आजूबाजूच्या शेकडो नागरिकांना त्रासदायक ठरेल असा उड्डाणपूल बांधल्याने त्याचा फटका येथील शांततेवर होणार आहे. शिवाय येथील झाडे नष्ट केल्याने रहिवाशांनाही मोठय़ा प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. पर्यावरण राखून विकास झाल्यास त्याला आमचा कोणताही विरोध नाही. मात्र पर्यावरण उद्ध्वस्त करून कोणालाही फायदा होणार नाही. अशा उड्डाणपुलाची निर्मिती होणार असेल तर मात्र त्याला आमचा विरोध असेल.
– अरूण पोंक्षे, ठाणे