जिल्ह्यतील ९७ टक्के करोनारुग्ण उपचारानंतर बरे

ठाणे : जिल्ह्य़ात गेल्या काही दिवसांपासून करोनाची दुसरी लाट ओसरू लागली असून जिल्ह्य़ात एक टक्क्य़ाहून कमी म्हणजेच, ०.९२ टक्के सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९ टक्के इतके झाले आहे. तर, मृत्यूचे प्रमाण १.९९ टक्के आहे. विशेष म्हणजे, रुग्ण संख्या कमी होत असताना वाढत असलेली मृत्यूंची संख्याही आता कमी होऊ लागली आहे.

ठाणे जिल्ह्य़ात आतापर्यंत ५ लाख २५ हजार २१० करोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ५ लाख ९ हजार ९३५ (९७.९ टक्के) रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १० हजार ४३० जणांचा मृत्यू झाला असून त्याचे प्रमाण १.९९ टक्के इतके आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्य़ात ४ हजार ८४५ इतके उपचाराधीन रुग्ण आहेत. ठाणे जिल्ह्य़ात सद्य:स्थितीत केवळ ४ हजार ८४५ करोना रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. त्यापैकी ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली या महापालिका क्षेत्रात ३ हजार ९४२, अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिका क्षेत्रात २९६, कल्याण ग्रामीण, भिवंडी ग्रामीण, अंबरनाथ ग्रामीण, शहरापूर आणि मुरबाड क्षेत्रात ६०७ सक्रिय रुग्ण आहेत.

काही महिन्यांपूर्वी जिल्ह्य़ात करोना रुग्ण संख्या वाढली होती. दररोज पाच ते सहा हजार रुग्ण आढळून येत होते. परंतु आता चारशे ते पाचशे रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्य़ात महिनाभरापूर्वी दहा टक्के उपचाराधीन रुग्ण होते. जिल्हा प्रशासन आणि पालिकांनी केलेल्या उपाययोजनांमुळे हे प्रमाण आता एक टक्क्य़ाहून कमी म्हणजेच, ०.९२ टक्के इतके आहे. जिल्ह्य़ात यापूर्वी दिवसाला ४० ते ५० रुग्णांचा मृत्यू होत होता. आता दिवसाला सरासरी २५ ते ३० रुग्णांचा मृत्यू होत आहे.

सर्वाधिक मृत्युदर भिवंडीत

बाधित रुग्णांचे आणि मृतांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा आणि महापालिका प्रशासनाने करोना चाचण्यांची संख्या वाढविली होती. त्यामुळे बाधित रुग्णाचा शोध घेऊन त्याला तात्काळ उपचार देणे शक्य होत होते. तसेच वेळीच उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाचे प्राण वाचविणे आरोग्य यंत्रणांना शक्य होत होते. त्यामुळेच जिल्ह्य़ात करोनाचा संसर्ग कमी होण्याबरोबरच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण बदलापूरमध्ये सर्वाधिक आहे. बदलापूरमधील २० हजार ८४८ रुग्णांपैकी २० हजार ४१७ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. सर्वाधिक मृतांचे प्रमाण हे भिवंडी शहरात आहे. भिवंडी शहरात आतापर्यंत १० हजार ६६२ करोनाबाधित आढळले असून त्यापैकी ४६० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एकूण १० हजार ४३० मृतांपैकी २ हजार ५७९ मृत्यू हे एकटय़ा कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील आहेत.

जिल्ह्य़ात करोना चाचण्या वाढविण्यात आल्या असून त्याचबरोबर करोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. त्यामुळे या रुग्णाचा इतरांशी येणारा संपर्क टळतो. वेळीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्याने तो लवकर बरा होत आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्य़ात लसीकरणालाही आता वेग आलेला आहे.

राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे