देशात महागाईने कसा उच्चांक गाठला आहे. सर्वसामान्य, गरीब लोकांचे कसे या महागाईमुळे हाल होत आहेत, या विषयावर कल्याण पश्चिमेतील बाजारपेठ भागातील दोन दुकानांमधील दोन कामगार दुकानात ग्राहक नसल्याने चर्चा करत बसले होते. ही चर्चा सुरू असताना एका कामगाराला आपल्या मित्राचे महागाई वरचे विचार न पटल्याने त्यांच्यात सुरुवातीला बाचाबाची, नंतर तुफान हाणामारी होऊन एका कामगाराने दुसऱ्या कामगाराच्या डोक्यात कुकरचे झाकण मारुन त्याला गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी घडली.

मनीष गुप्ता असे आरोपी कामगाराचे नाव आहे. धीरज पांडे यांच्या डोक्यात कुकरचे झाकण मारल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. मनीष, धीरज हे बाजारपेठ विभागात दोन स्वतंत्र भांड्यांच्या शेजारी असलेल्या दुकानात कामगार म्हणून कामाला आहेत. दोन्ही दुकानात ग्राहक नसले की एकत्र येऊन ते गप्पा मारतात. शुक्रवारी दुपारी दोन्ही कामगारांच्या दुकानात ग्राहक नसल्याने ते एकत्र येऊन देशात आता वाढलेली महागाई. त्यामुळे लोकांचे होणारे हाल या विषयावर चर्चा करत होते. यावेळी धीरज पांडे देशावर असलेले कर्ज, केंद्र सरकारने मांडलेला अर्थसंकल्प आणि त्याची होत असलेली अंमलबजावणी आणि लोकांचे सुरू असलेले हाल याविषयी बोलत होता.

हेही वाचा : भुरळ घालून एटीएम कार्ड चोरणाऱ्या चेन्नईतील भुरट्याला कल्याण मध्ये अटक ; विविध बँकांची ३३ एटीएम कार्ड जप्त

हे विचार शेजारील दुकानातील मनीष गुप्ताला याला आवडले नाहीत. तो धीरजला रोखून त्याचे विषय खोडून काढू लागला. हे धीरजला आवडले नाही. यावरुन धीरज, मनीष यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. नंतर हा विषय हाणामारीपर्यंत गेला. अखेर मनीषने रागाच्या भरात दुकानातील कुकरचे भांडण जोराने धीरजच्या डोक्यात मारले. तो गंभीर जखमी झाला. दोन्ही दुकानांचे मालक घटना घडल्यावर आले. त्यांनी हे प्रकरण वाद चिघळू नये म्हणून पोलीस ठाण्यात नेले. धीरजच्या तक्रारी वरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. मनीषला अटक करण्यात आली आहे, असे बाजारपेठ पोलिसांनी सांगितले.