ठाणे : कांद्याची आवक घटल्याने सोमवारी घाऊक बाजारात ५५ ते ६० रुपये प्रति किलोने कांद्याची विक्री होत होती. घाऊक बाजारात कांद्याचे दर वाढताच मुंबई महानगर पट्टय़ातील ठाणे, नवी मुंबई तसेच आसपासच्या शहरांमधील किरकोळ बाजारात जास्त दराने विक्री होत आहे. किरकोळ बाजारात कांद्याची ८० ते १०० रुपयांनी विक्री सुरू आहे. मुंबई तसेच उपनगरांमध्ये पुणे आणि नाशिक जिल्ह्यातून मोठय़ा प्रमाणात कांद्याची आवक होत असते. मार्च महिन्यात बाजारात उन्हाळी कांदा विक्रीसाठी दाखल होतो. या कांद्याचा मोठय़ा प्रमाणात साठा केला जातो. जवळपास सहा ते सात महिने कांद्याचा हा साठा पुरवठय़ाला येत असतो. परंतु,ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांच्या कालावधीत कांद्याचा साठा काहीसा संपत येतो. तसेच वातावरणात होत असलेल्या बदलामुळे कांदे खराब होतात. यामुळे त्याची आवक घटते. आताही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून घाऊक आणि किरकोळ बाजारात कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. तीन दिवसांपूर्वी घाऊक बाजारात कांद्याची ४० ते ५० रुपये प्रति किलोने विक्री होत होती. तर, किरकोळ बाजारात ७० ते ७५ रुपये प्रति किलोने विक्री केली जात होती. तर, सोमवारी घाऊक बाजारात ५५ ते ६० रुपये तर किरकोळ बाजारात ८० ते १०० रुपये प्रति किलोने कांदा विक्री सुरू होती. वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी कांद्याच्या १६६ गाडय़ा दाखल झाल्या आहेत. या गाडय़ांमधून आलेल्या कांद्यामध्ये कमी दर्जाच्या कांद्याचे प्रमाण सर्वाधिक होते. हे कांदे आकाराने लहान आणि काहीसे खराब झालेले होते. तर उत्तम दर्जाच्या कांद्याची आवक कमी प्रमाणात झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. किरकोळ बाजारात अवाच्या सव्वा दर कांद्याची आवक घटल्याने प्रत्येक बाजारात कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. या दरवाढीचा फायदा किरकोळ बाजारातील कांदे विक्रेते चांगलाच घेताना दिसत आहेत. कांद्याची आवक घटल्याच्या नावाखाली ग्राहकांकडून अवाच्या सव्वा दर आकारले जात आहे. ठाणे शहरातील काही भागात ८० रुपये तर, काही भागात १०० रुपये प्रति किलोने आणि नवी मुंबई शहरात ९० रुपये प्रति किलोने कांद्याची विक्री करण्यात येत आहे. देशभरात कांद्याचा सरासरी दर ५०.३५ रुपये नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत सोमवारी कांद्याच्या भावाने उच्च पातळी गाठली. किरकोळ बाजारात कांद्याचा सरासरी दर ७८ रुपये प्रति किलो होता. ग्राहक व्यवहार विभागाने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार कांद्याचा देशभरातील सरासरी दर ५०.३५ रुपये प्रति किलो आहे. त्यात कमाल दर ८३ रुपये प्रति किलो होता, किमान दर १७ रुपये होती. आधारभूत किंमत ६० रुपये प्रति किलो होती.