भगवान मंडलिक, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली- भाद्रपद गणेश चतुर्थीला घरोघरी गणपती पूजन होत असल्याने पुजेसाठी पुरोहित उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अनेक गणेश भक्तांनी पुरोहितांकडे ऑनलाईन पुजेची आग्रही मागणी केली आहे. या मागणीला अनेक पुरोहितांनी प्रतिसाद देऊन ऑनलाईन पध्दतीने पूजा सांगण्याची तयारी दर्शविली आहे.

बुधवारपासून गणेशोत्सव सुरू होत असल्याने गणपती प्राणप्रतिष्ठेसाठी पुरोहित पुजेसाठी मिळावेत म्हणून गणेश भक्तांची धावपळ सुरू आहे.

काही पुरोहितांनी भ्रमणध्वनीवर आगाऊ नोंदणी करुन त्याप्रमाणे आणि त्या वेळेत गणेश भक्ताच्या घरी पुजेसाठी जाण्याचे नियोजन केले आहे. पुरोहितांच्या हातून गणेश पूजा व्हावी असा आग्रह असणाऱ्या गणेश भक्तांच्या गणपतीचे पूजन रात्री बारा वाजल्यानंतर करणार असल्याचे काही पुरोहितांनी सांगितले. वर्षानुवर्ष ठराविक रहिवासी ठराविक पुरोहितांना घरी बोलावून घरातील धार्मिक विधी कार्य, गणपती पूजन करुन घेतात. असे पुरोहित ठराविक घरचे गणपती पूजन करतात. अनेक गुरुजी आता वृध्द झाल्याने ते घरोघरी जाऊन दिवसभर गणपती पूजन करू शकत नाहीत. त्यांनीही घर बसल्या ऑनलाईन पध्दतीने पूजा सांगण्याची तयारी काही गणेश भक्तांना दर्शवली आहे.

हेही वाचा >>> ठाणे : गणेशमूर्ती विसर्जनासाठी ऑनलाईन वेळ निश्चितीची सुविधा सुरु

पूजेची तयारी

ऑनलाईन पूजेची मागणी करणाऱ्या भक्तांना पूजेची सर्व तयारी अगोदरच करण्यास सांगितली जाते. जी वेळ पूजेसाठी सांगितली जाते, त्या वेळेत त्या गणेश भक्ताने पूजेसाठी तयार राहायचे आहे. ही पूजा झुम, व्हाॅट्सप, फेसबुक थेट प्रक्षेपण, युट्युब  माध्यमातून सांगितली जाते. भक्ताचे समाधान होईल अशा पध्दतीने ही पूजा सांगितली जाते. पूजा ऑनलाईन आहे म्हणून कोणताही घाईगडबडीत केला जात नाही. एका पूजेनंतर दुसऱी पूजा करायची असेल तर ठरल्या वेळेत पूजा पूर्ण केली जाते, असे डोंबिवलीतील ज्येष्ठ पुरोहित प्रदीप जोशी गुरुजी यांनी सांगितले.

ऑनलाईन, युट्युब माध्यमातून पूजा सांगितल्या नंतर कोणत्याही भक्ताकडे दक्षणेची मागणी केली जात नाही. ती ऐच्छिक आहे. भक्तांना वाटले तर त्यांच्या मनाजोगी दक्षणा ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष येऊन देतात. हा आपला मागील दोन वर्षाचा अनुभव आहे. दक्षणेसाठी आपण कोणावरही जबरदस्ती करत नाही, असे जोशी गुरुजी यांनी सांगितले.

गणपती उत्सवात प्रत्येकाला पुरोहिताच्या हातून गणेश पूजन व्हावे असे वाटते. म्हणून आपण गणपती उत्सवात आपल्याकडे नोंदणी करणाऱ्या गणेश भक्तांच्या गणपतीचे पूजन करुन देतो. जेवढ्या भक्तांनी नोंदणी केली आहे. तेथील गणपतींचे विधिवत पूजन आपण करतो, असे डोंबिवलीतील पुरोहित जयेश जोशी यांनी सांगितले.

हेही वाचा >>> ठाणे : १ लाख ४० हजार गणेश मुर्तींची प्राणप्रतिष्ठापना

डोंबिवलीतून १०.३० वा. प्रक्षेपण

बुधवारी सकाळी गणपती पूजनाच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता डोंबिवलीतील ज्येष्ठ पुरोहित प्रदीप जोशी गुरुजी यथासांग गणपती पूजनाच्या प्रतिष्ठापना विधी कार्याला सुरुवात करणार आहेत. आपल्या धर्मपक्ष युट्युब वाहिनीवरुन गणेश भक्त हे प्रक्षेपण पाहून गणपती प्रतिष्ठापना विधी करू शकतात. आपल्या फेसबुक प्रक्षपेणातून गणेश भक्त पूजा विधी करू शकतात, असे जोशी गुरुजींनी सांगितले.

बुधवारी सकाळी साडे दहा वाजता गणपती पूजन थेट प्रक्षेपणातून सुरू होणार असल्याने भक्तांनी अगोदरच प्राणप्रतिष्ठेच्या मंडपात पूजा साहित्याची तयारी ठेवावी, असे आवाहन ऑनलाईन पूजा सांगणाऱ्या पुरोहितांनी केले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Online ganesh chaturthi pujas in demand zws
First published on: 29-08-2022 at 15:52 IST