भगवान मंडलिक

मोठागाव येथील प्रकल्पाचे ६० टक्के तर आंबिवलीतील प्रकल्पाचे ५० टक्के काम पूर्ण

कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत शहराच्या विविध भागात असलेल्या सहा मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रांची ऑनलाइन दूरसंवेदन यंत्रणेद्वारे हाताळणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. गेल्या ४० वर्षांपासून ही केंद्रे मानवी हातळणीतून चालवली जात होती. नवीन अत्याधुनिक प्रणालीमुळे हा हस्तक्षेप पुढील काळात थांबणार आहे.

सुरत येथील मे. नेक्स्टजेन कंपनीने हे काम घेतले आहे. मागील आठवडय़ात महापालिकेने या कंपनीची मलप्रक्रिया केंद्र ऑनलाइन पद्धतीने चालविण्याच्या कामासाठी नियुक्ती केली. या कामासाठी अन्य स्पर्धक कंपन्यांनी चढय़ा दराच्या निविदा भरल्या होत्या. मे. नेक्सटजेन कंपनीची निविदा अन्य कंपन्यांच्या तुलनेत कमी दराची असल्याने प्रशासनाने या कंपनीची निविदा स्वीकारली. कल्याण-डोंबिवली शहरांचा प्रशासकीय कारभार ४५ वर्षांपूर्वी नगरपालिकांच्या माध्यमातून चालविला जात होता. लोकसंख्या आटोपशीर होती. शहरात तयार होणाऱ्या शौच पाण्याचे प्रमाण कमी होते. कल्याणमध्ये आधारवाडी, डोंबिवलीत मोठागाव येथे नगरपालिका काळातील मल प्रक्रिया केंद होती. या केंद्रांच्या माध्यमातून शहरातील एकूण २० ते ३० दशलक्ष लिटर (एमएलडी) मल पाण्यावर प्रक्रिया केली जात होती. २०११ पर्यंत या केंद्रांवर पालिकेची भिस्त होती. कल्याण, डोंबिवलीची लोकसंख्या वाढली. मल पाण्याचे प्रमाण वाढले. त्या प्रमाणात मलप्रक्रिया केंद्रांची क्षमता पुरेशी नसल्याने अतिरिक्त मल पाणी प्रक्रिया न करताच उल्हास खाडीत सोडण्यात येत होते.

शहराची वाढती लोकसंख्या आणि सांडपाण्याचे वाढते प्रमाण विचारात घेऊन महापालिकेने जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानातून ११ वर्षांपूर्वी शहरात सहा मल प्रक्रिया उभारण्याचा निर्णय घेतला. कामाची संथगती, निधीची अडचण, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि ठेकेदाराची मनमानी यामुळे हे प्रकल्प अनेक वर्षे रखडले होते.

प्रस्तावित प्रक्रिया केंद्र

  • मोठागाव (जुना प्रकल्प) ४० एमएलडी क्षमता. प्रत्यक्षात चार एमएलडीवर प्रक्रिया
  • मोठागाव (नवीन प्रकल्प) ४० एमएलडी क्षमता. या प्रकल्पाचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर अखेपर्यंत हा प्रकल्प सुरू होईल.
  • आंबिवली २१ एमएलडी क्षमता. ५० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. डिसेंबर अखेपर्यंत प्रकल्प सुरू होईल.
  • आधारवाडी २६ एमएलडी क्षमता. ७५ टक्के काम पूर्ण. डिसेंबपर्यंत प्रकल्प सुरू होईल.
  • सर्व एसटीपी प्रकल्प आणि या प्रकल्पांना शहरातील मुख्य मल वाहिन्या जोडण्याची कामे डिसेंबपर्यंत पूर्ण.