कल्याण – १५ ऑगस्ट रोजी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील कत्तलखाने बंद ठेवण्या बरोबर मटण मांस विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश प्रशासनाने १९८७ च्या शासन निर्णयाप्रमाणे काढला आहे. या आदेशावरून राज्यभर विविध क्षेत्रातून तीव्र निषेध आणि रान उठल्याने बुधवारी पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पत्रकार घेतली. आणि शहरात मटण, मांस खाण्यावर नाही तर विक्रीवर बंदी आहे, असे स्पष्ट केले आणि प्रशासन आपल्या बंदीच्या निर्णयावर ठाम असल्याचे दाखवून दिले.

प्रशासन मागील अनेक वर्षापासून १५ ऑगस्टला शहरातील कत्तलखाने, मटण, मांस विक्री बंद ठेवण्याचे आदेश शासन आदेशाप्रमाणे काढत आले आहे. यात पालिकेने नवीन काहीही आदेश काढलेला नाही. नागपूर, छत्रपती संभाजीनगर, इचलकरंजी अशा काही महापालिकांनी त्यांच्या स्तरावर आदेश काढले आहेत. १५ ऑगस्ट रोजी शहरातील कत्तलखाने बंद राहतील. मटण, मांस विक्री व्यवहारावर शासन निर्णयाप्रमाणे बंदी असेल. नागरिकांच्या खाण्यावर बंदी असे प्रशासनाने कोठेही म्हटलेले नाही, असे आयुक्त गोयल यांनी स्पष्ट केले.

काही राजकीय नेत्यांनी स्वातंत्र्यदिनी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत मटण खाण्याचा, मेजवानी करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. या प्रश्नावर उत्तर देताना आयुक्तांनी पोलीस प्रशासनाच्या साहाय्याने ही परिस्थिती हाताळण्यात येईल, असे सांगितले. अनेक संघटना, राजकीय मंडळींनी पालिकेला कत्तलखान, मटण मांस विक्री बंदच्या निर्णयाविषयी निवेदने दिली आहेत. लोकभावनेचा विचार करून प्रशासन स्तरावर यावरही विचार करू. यासंंदर्भात काही ठोस निर्णय झाला तर माध्यमांच्या माध्यमातून समाजाला कळविण्यात येईल, असे आयुक्त गोयल यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, परवाना विभाग उपायुक्त कांचन गायकवाड उपस्थित होते.

गेल्या तीन दिवसांपासून पालिका प्रशासनाच्या निर्णयावर विविध स्तरातून टीका होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड, युवा नेते आदित्य ठाकरे, मनसेचे नेते राजू पाटील, ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दीपश म्हात्रे, राष्ट्रवादी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, मनसेचे मनोज घरत, ठाकरे गटाचे सुधीर बासरे, शहरप्रमुख अभिजीत सावंत, हिंदु खाटिक समाज संस्थेचे शिरीष लासुरे यांनी पालिकेच्या मटण मांस विक्री बंदीच्या निर्णयावर टीका करून हा बंदी आदेश मागे घेण्याची मागणी केली आहे. हा आदेश मागे घेण्यात आला नाहीतर पालिकेच्या मुख्य प्रवेशव्दारावर मटण विक्री करण्याचा इशारा हिंदु खाटिक समाजाने दिला आहे.