ठाणे : जैतापूर आणि नाणार या प्रकल्पांचा विरोध समजून घेणे आवश्यक आहे. देशात कोणताही मोठा प्रकल्प येणार असेल तेव्हा जमीन अधिग्रहणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनामध्ये अतिक्रमण होते. त्यामुळे स्थानिकांचे प्रकल्पाबाबत प्रबोधन होणे गरजेचे आहे. प्रकल्पाचा परिणाम सकारात्मक होईल असा लोकांना विश्वास पटला तर विरोध थांबेल, परंतु सध्या तशी परिस्थिती नाही. कारण आपल्या येथे राजकारण चांगले नाही. ही खरी शोकांतिका आहे, असे मत जेष्ठ अणुशास्त्रज्ञ डाॅ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.

वैष्णो व्हिजन आणि ग्रंथाली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भेट दिग्गजांची’ या मुलाखत मालिकांचा शुभारंभ रविवारी करण्यात आला. यावेळी जेष्ठ अणुशास्त्रज्ञ डाॅ. अनिल काकोडकर यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी डाॅ. काकोडकर बोलत होते. देशात कोणताही मोठा प्रकल्प येणार असेल तेव्हा जमीन अधिग्रहणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनामध्ये अतिक्रमण होत असते. त्यामुळे तेथील नागरिकांना मोबदला मिळाला पाहिजे, त्यांचे स्थलांतर झाले पाहिजे. बऱ्याच ठिकाणी लोकांना अनुभव चांगला नसतो. त्यामुळे लोक भरडली जातात. ज्या लोकांचे ‘वजन’ असते, ज्यांची ओळख असते, त्यांना सगळे मिळते. परंतु सामान्य माणसाला बऱ्याचदा ते मिळत नाही.

जैतापूर आणि नाणार या दोन्ही प्रकल्पांतील गुंतवणूक मोठी आहे. ज्या ठिकाणी हे प्रकल्प होणार तेथे पुरवठादार तसेच विविध माध्यमातून अर्थकारण तयार होणार आहे. पण यामध्ये बाहेरच्या लोकांचा किती फायदा होतो आणि स्थानिकांचा किती हा देखील प्रश्न आहे. त्यामुळे समाजात तेढ निर्माण होते. प्रकल्प होणार असेल हा परिणाम सकारात्मक होईल अशी काळजी घ्यायला हवी. या लोकांच्या हातून चांगले घडेल असा स्थानिकांना विश्वास पटला तर, विरोध थांबेल, परंतु सध्या तशी परिस्थिती नाही. कारण आपल्या येथील राजकारण तेवढे चांगले नाही. ही खरी शोकांतिका असल्याचे डाॅ. काकोडकर म्हणाले.

अणुऊर्जाबद्दलही त्यांनी माहिती दिली. आजही अणुशक्तीबाबत बरेच समज गैरसमज आहेत. तंत्रज्ञानाच्यादृष्टीने मोठी स्थित्यंतरे होतात तेव्हा असे गैरसमज निर्माण होत असतात. अणूशक्तीची ओळखच हिरोशीमा, नागासाकीपासून झाल्याने त्याबाबत गैरसमज आहे. अणुशक्तीतून वीज निर्मिती आणि इतर अनेक फायदे लोकांसमोर नंतर येतात. त्यामुळे समाजमनात अणुशक्तीबाबत भिती खोलवर दडली आहे. पुर्वीपेक्षा कितीतरी पट ऊर्जा आपल्याला लागत आहे. जग पुढे बदलणार आहे त्यामुळे आणखी ऊर्जा लागणार आहे. ऊर्जा निर्मितीसाठी इंधनसाठे कमी पडणार आहे, हे साठे केव्हा तरी संपणार आहे पण ऊर्जेची गरज मात्र वाढणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कमी साधनसामग्री वापरुन जास्त ऊर्जा निर्मिती करता येईल असे साठे हवे आहेत. ऊर्जेची गरज वाढत आहे. पण पृथ्वीवरील संसाधने मात्र मर्यादीत आहेत. ज्याची मात्रा कमी लागेल अशा संसाधनांचा शोध घ्यावा लागेल असेही ते म्हणाले. डाॅ. काकोडकर यांची मुलाखत निवेदिका मनाली दिक्षीत यांनी घेतली. या कार्यक्रमास खगोल शास्त्रज्ञ दा. कृ. सोमण, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष जेष्ठराज जोशी, सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी उपस्थित होते.