गेल्या निवडणुकीतील मते पाहून पक्षांकडून प्रचाराची व्यूहरचना

पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढत असल्याने आता पक्षाची ताकद शोधण्यावर भर दिला जात आहे. कोणत्याही भागात कोणता पक्ष सरस ठरू शकेल याची चाचपणी करण्यात येत असून त्यानुसार प्रचाराची व्यूहरचना आखली जात आहे. यासाठी २०१४च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या मतांच्या आकडेवारीची मदत घेतली जात आहे.

पालघर जिल्हय़ात वसई, नालासोपारा, बोईसर, पालघर, विक्रमगड, डहाणू असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या निवडणुकीत शिवसेना-भाजप स्वतंत्र लढले होते. बहुजन विकास आघाडीला २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे ३ लाख १७ हजार मते मिळाली होती. त्याखालोखाल शिवसेनेला २ लाख ४७ हजार ७३८ तर भाजपाला २ लाख ८ हजार आणि काँग्रेसला ९२ हजार असे पक्षीय बलाबल होते.

ही मते पोटनिवडणुकीतही आपल्याकडेच राहावीत, असा प्रत्येक पक्षाचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने निवडणूक प्रचाराची व्यूहरचना आखली जात आहे. ज्या मतदारसंघात आपले मतदार सर्वाधिक आहेत, त्यावर लक्ष केंद्रित करण्यास राजकीय पक्षांनी सुरुवात केली आहे. बहुजन विकास आघाडीचा वसई-विरार हा बालेकिल्ला आहे, तर पालघरमध्ये शिवसेनेचे प्राबल्य आहे. ग्रामीण आणि आदिवासीबहुल पट्टय़ात भाजपाचे पारंपरिक मतदार आहेत.

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट होती आणि भाजप-सेना युतीचा उमेदवार होता. त्या वेळी भाजपा उमेदवार चिंतामण वनगा ५ लाख ३३ हजार मते मिळवून विजयी झाले होते, पण तरीदेखील बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना एकूण ३५ टक्के म्हणजे २ लाख ९३ हजार मते मिळाली होती. या मतदारांना आपल्याकडे ठेवण्यात राजकीय पक्षांचा प्रयत्न आहे.

पहिले नमन धार्मिक स्थळांना

पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीने प्रचारात वेग घेतला असला तरी उमेदवार आणि नेत्यांनी धार्मिक स्थळांना भेटी देण्यावर भर दिला आहे. वसईतील ख्रिस्ती मतदारांना आकर्षित करण्यासाठी वसई धर्मप्रांताचे आर्चबिशपांना उमेदवार भेटू लागले आहेत. शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांनी वसई धर्मप्रांताचे आर्चबिशप फेलिक्स मच्याडो यांची भेट घेतल्यानंतर बविआचे उमेदवार बळीराम जाधव यांनीही आर्चबिशपांची भेट घेतली. जाधव यांनी वसईतील गुरुद्वारात जाऊन दर्शन घेतले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही वसईतील भेटीत आधी शनिमंदिरात जाऊन आरती केली. वनगा यांनीही स्थानिक मंदिरांना भेटी देण्यावर भर दिलेला आहे. आदित्य ठाकरे यांच्या प्रचार दौराही मंदिरांना भेटी देऊन होणार आहे.