मुंबई-अहमदाबाद मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या जीवघेणी झाली आहे. नादुरूस्त रस्ते, खड्डे यामुळे आजवर अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. पण रुग्णवाहिका वेळेवर रुग्णालयात न पोहोचल्यामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटनाही आता घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई-अहमदाबाद मार्गावर कमालीची वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे पालघरच्या छाया पुरव यांना आपला जीव गमवावा लागला आहे.
प्रकरण काय?
पालघर जिल्ह्यात राहणाऱ्या ४९ वर्षीय छाया पुरव आपल्या घराजवळ असताना त्यांच्या डोक्यावर झाडाची फांदी पडली. ३१ जुलै रोजी घडलेल्या या दुर्घटनेत छाया यांच्या डोक्याला, खांद्याला आणि मणक्याला जबर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारांची गरज होती. मात्र पालघर जिल्ह्यात ट्रॉमा सेंटर नसल्यामुळे स्थानिक रुग्णालयाने त्यांना हिंदुजा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.
तीन तासात फक्त ७० किमीचा प्रवास
स्थानिक रुग्णालय ते मुंबईतील हिंदुजा रुग्णालय असा १०० किमीचा प्रवास अडीच तासात होणे अपेक्षित आहे. पण दुर्दैवाने तसे होऊ शकले नाही. २ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास छाया पुरव यांना भूल देण्यात आली आणि त्यांचा रुग्णवाहिकेतून प्रवास सुरू झाला. त्यांच्याबरोबर त्यांचे पतीही रुग्णवाहिकेत होते. त्यानंतर रुग्णवाहिका एनच-४८ वरील महामार्गावर आली.
मात्र सायंकाळी ६ वाजता रुग्णवाहिकेने अर्धेच अंतर पार केले होते. भूलेचा परिणामही हळूहळू ओसरू लागला होता. त्यामुळे छाया पुरव यांना तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यांची प्रकृती नाजूक असल्यामुळे वाटेतच मीरा रोड येथील ऑर्बिट रुग्णालयात सायंकाळी ७ वाजता त्यांना दाखल करण्यात आले. इथून हिंदुजा रुग्णालय केवळ ३० किमीच्या अंतरावर होते. तीन तासांत रुग्णवाहिका केवळ ७० किमीचे अंतर कापू शकली होती.
मात्र ऑर्बिट रुग्णालयात दाखल करूनही फारसा उपयोग झाला नाही. डॉक्टरांनी छाया पुरव यांची तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. छाया पुरव यांचे पती कौशिक पुरव यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की, अर्धा तास आधी आम्ही रुग्णालयात पोहचू शकलो असतो तर त्या वाचल्या असत्या. मी चार तास तिला रुग्णवाहिकेतच विव्हळताना पाहत होतो.
एनडीटीव्हीशी बोलताना कौशिक पुरव पुढे म्हणाले, “आम्ही छायाला वाचविण्याचा खूप प्रयत्न केला. पण वाहतूक कोंडीमुळे आमचे प्रयत्न निष्फळ ठरले. रस्त्यावर खूप खड्डे होते. त्यामुळे तिला वेदना होत होत्या. ती विव्हळत होती. तिला लवकर रुग्णालयात नेण्याचा दुसरा पर्याय नव्हता. वाहतूक कोंडीने माझ्या पत्नीचा बळी घेतला.”