वसई-विरारसह मुंबईतील बहुभाषिक भाविकांची हजेरी

वसई : येथील सर्वधर्मीयांमध्ये लोकप्रिय असलेला ‘पालीचा फेस्ता’ अर्थात देवमाता चर्चचा सण बुधवारी साजरा होत आहे. या सणाला वसई-विरारसह मुंबई तथा आजूबाजूच्या परिसरातील बहुभाषिक भाविक मोठय़ा संख्येने येत असल्यामुळे त्यांच्या सोयीसाठी चर्चपातळीवरील संघटनांसह पोलीस आणि महापालिकेने चोख व्यवस्था ठेवली आहे. सकाळी चर्चमधील प्रार्थनाविधी आटोपल्यावर दुपारपासून चर्च परिसरात मोठी जत्रा भरणार आहे. रात्री उशिरापर्यंत ही जत्रा सुरू राहणार असून मनोरंजनासाठी विविध प्रकारची खेळणी परिसरात लावण्यात आली आहेत. वसईत पोर्तुगीज काळापासून हा सण भक्तिभावाने साजरा केला जातो.

नायगाव पश्चिमेकडील पाली येथील ‘माय दे देऊस’ म्हणजेच ‘देवाची माता’ या चर्चचा सण दरवर्षी १८ डिसेंबरला साजरा केला जातो. नाताळपूर्वीचा जल्लोष या सणात अनुभवास येतो. या सणानंतरच वसईत नाताळगीतांचे ध्वनी कानी पडू लागतात. केवळ वसई-विरारमधीलच नव्हे तर मुंबईसह आजूबाजूच्या परिसरातून सर्वधर्मीय बहुभाषिक भाविक या सणाला हजेरी लावून दिवसभर भरणाऱ्या जत्रेचा आनंद घेतात.

वसईत निर्मळची वार्षिक जत्रा ज्या प्रकारे प्रसिद्ध आहे. तसेच पाली चर्चचा सण ‘पालीचा फेस्ता’ म्हणून लोकप्रिय आहे. संपूर्ण वसईत पाली हे असे एकमेव चर्च आहे की, जिथे फेस्ता होतो. वसईत प्रत्येक चर्चच्या सणाच्या दिवशी लहान-मोठय़ा जत्रा भरत असल्या तरी पालीच्या फेस्त्याची मजा वेगळीच असते. या दिवशी दिवसभर उत्साह असतो. कारण आठवडाभरातच नाताळ येणार असतो. पालीच्या फेस्त्यामध्ये धर्माच्या भिंतीही नाहीशा झालेल्या दिसून येतात. त्यामुळे संध्याकाळी विविध धर्मीय जत्रेचा आनंद घेताना दिसतात. त्यातही सर्वधर्मीय मच्छीमार भाविकांची संख्या मोठी असते.

यंदाही पालीच्या फेस्त्याला होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे चोख नियोजन केले आहे. वसई तथा नायगाव रेल्वे स्थानकातून पालीच्या दिशेने येणारी वाहने चर्चपासून १५० ते २०० मीटर अंतरावर थांबविण्यात येणार आहेत. याशिवाय कोणताही गैरप्रकार दिवसभरात घडू नये, यासाठी जत्रेदरम्यान पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.

साध्या वेशातील पोलीसही या ठिकाणी तैनात असणार आहेत. याशिवाय वसई-विरार शहर महापालिकेतर्फेही जत्रेदरम्यान सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या ‘आय’ प्रभाग समितीकडून पाली परिसराची संपूर्ण साफसफाई करण्यात आली असून भाविकांच्या सोयीकरिता ठिकठिकाणी सुलभ शौचालये ठेवण्यात आलेली आहेत. पालिकेचे कर्मचारीही गरजेच्या वेळी साफसफाईकरिता चर्चपरिसरात नियुक्त करण्यात आलेले आहेत, अशी माहिती स्वच्छता निरीक्षक विकास पाटील यांनी दिली.

४४२ वर्षांपूर्वीचा वास्तुकलेचा नमुना

वसईच्या खाडीलगत दिमाखाने उभे असलेले पाली चर्च म्हणजे स्थापत्यकलेचा अनोखा आविष्कार आहे. या चर्चची उभारणी ४४२ वर्षांपूर्वी १५७७ मध्ये पोर्तुगिज काळात झाली. ‘माय दे देऊस’ म्हणजे ‘देवाची माता’ असे या चर्चचे नामाभिधान पोर्तुगिज काळापासून आहे. या चर्चची इमारत वेगवेगळ्या अवस्थांतून गेली आहे. वेगवेगळ्या काळात विस्तार विभाग जोडले गेले आहेत. वेगवेगळ्या धर्मगुरूंनी आपले कौशल्य त्यात दाखवले आहे. दर वर्षी १८ डिसेंबर रोजी येथे पवित्र मरियेचा सण साजरा केला जातो.