डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ पंडित दिनदयाळ रस्त्यावरील एव्हरेस्ट हाऊसमधील एक धोकादायक इमारत पुनर्बांधणीसाठी पोकलेनच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात येणार आहे. सोमवारपासून सुरू झालेले हे काम पुढील सोमवारपर्यंत सुरू राहणार आहे. मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर हे काम होणार असल्याने वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी या तोडकामासाठी पंडित दिनदयाळ रस्त्यावरील दिनदयाळ चौक येथे (जुने द्वारका हाॅटेल) येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कोपर पुलाजवळील हाॅटेल रणजित येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे अशी अधिसूचना काढली आहे.
सोमवारपासून हे काम सुरू झाले आहे. मंगळवार ते पुढील सोमवारपर्यंत हे काम तोडकाम सुरू राहणार असल्याने या कालावधीत पंडित दिनदयाळ चौक रस्त्याकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक कोपर पुलाजवळील हाॅटेल रणजित येथे बंद करण्यात येणार आहे. सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वेळेत हे तोडकाम सुरू राहणार आहे. गेल्या एप्रिलमध्ये असेच तोडकाम या भागात करण्यात आले होते. त्यावेळीही या रस्त्याची एक मार्गिका वाहतुकीसाठी वाहतूक विभागाच्या नियोजनाप्रमाणे बंद ठेवण्यात आली होती.
पंडित दिनदयाळ चौकाकडे (जुने सम्राट हाॅटेल) येणारी सर्व प्रकारची वाहने सात दिवस बंद राहणार असल्याने ही वाहने हाॅटेल रणजित येथे डावे वळण घेऊन जुनी डोंबिवली देवी चौकमार्गे किंवा जोंधळे हायस्कूल समोरून स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, विष्णुनगर विभागाकडून पंडित दिनदयाळ रस्त्याने सम्राट चौक, माणकोली पुलाकडे जातील, असे वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी जाहीर केले आहे.
धोकादायक इमारत तोडण्यात येणारा भाग डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील परिसर आहे. या भागात रिक्षा वाहनतळ, शालेय बस, अवजड वाहने, माणकोली पुलाकडून येणारी, जाणारी वाहने यांची वर्दळ असते. त्यामुळे या सात दिवसांच्या कालावधीत या भागात वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी ठेकेदार आणि वाहतूक विभागाने आवश्यक वाहतूक पोलीस, खासगी सुरक्षा रक्षक या भागात तैनात ठेवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या कालावधीत अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिका, गॅस सिलिंडर, ऑक्सिजन सिलिंडर, ग्रीन काॅरिडाॅर, पोलीस, अग्निशमन दलाच्या वाहनांना या भागातून प्रवेश असेल. पंडित दिनदयाळ चौक भागातून जुनी डोंबिवली, मोठागाव, ठाकुरवाडी, देवीचापाडा, आनंदनगर भागात वाहने धावतात. माणकोली पुलाकडून धावणाऱ्या वाहनांची या भागातील संख्या अधिक आहे. याशिवाय शाळेतील बस अधिक प्रमाणात याच रस्त्यावरून धावतात. त्यामुळे या तोडकामाचा प्रवासी, शालेय विद्यार्थ्यांना फटका बसणार नाही याची विशेष काळजी घेण्याची प्रवासी, शिक्षण संस्था संचालकांची मागणी आहे.