डोंबिवली पूर्वेतील पीएनटी कॉलनी परिसरातील ‘रॉयल इंटरनॅशनल’ या शाळेने केलेल्या शुल्क वाढीविरोधात शेकडो विध्यार्थी आणि पालकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. वर्षांला तब्बल सहा हजार रुपये शुल्क वाढविल्याने पालकवर्गात एकीकडे संतापाचे वातावरण पसरले आहे. मात्र शाळेचे विश्वस्त रजनीकांत शाह यांनी शाळा उभारणीसाठी मोठय़ा प्रमाणावर खर्च येणार असल्याचे पालकांना सांगितले आहे. दरम्यान, शुल्कवाढ नियमानुसार करण्यात आल्याचे स्पष्टीकरण शाळेच्या व्यवस्थापनाने दिले आहे. विशेष म्हणजे शाळेत पालक-शिक्षक संघाची नेमणूक न करताच ही शुल्कवाढ करण्यात आली आहे.
शुल्कवाढीविरोधात दुपारच्या सुमारास रॉयल इंटरनॅशनल शाळेच्या व्यवस्थापनाविरोधात आंदोलन केले. इयत्ता पहिलीसाठी मागच्या वर्षी २० हजार इतके शुल्क आकारण्यात येत होते. यंदा हे शुल्क सहा हजार रुपयांनी वाढवल्याने ते २६ हजार झाले आहे. सहा हजार रुपयापर्यंत शुल्कवाढ करण्यात आल्याने शाळेच्या मुख्याध्यापकांकडे पालकांनी विचारणा केली. मात्र, याप्रकरणी उत्तर देण्यास आपल्याकडे अधिकार दिलेले नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शाळेचे विश्वस्त रजनीकांत शहा यांच्याशी संपर्क साधण्याच्या सूचना केल्या. पालकांनी याबद्दल विचारपूस केली असता त्यांना उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली,
दरम्यान, शहा यांनी मी आता डोंबिवलीच्या बाहेर असल्याने आता काही बोलू शकत नाही, असे ‘ठाणे लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले.
शाळेत विद्यार्थ्यांना मनाई?
शाळेत पालक, शिक्षण समितीची स्थापना करा; त्यानंतरच वाढीव शुल्क भरू, अशी पालकांची आग्रही मागणी आहे. शाळेच्या व्यवस्थापनाकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्यामुळे पालकांमध्ये नाराजीचा सूर आहे. शाळेच्या बांधकामांसाठी खर्च वाढला आहे. त्यामुळे शुल्कवाढ करण्याशिवाय पर्याय नाही, असे मत व्यवस्थापनाने मांडल्याचा पालकांचा आक्षेप आहे. काही पालकांनी आखण्यात आलेले वाढीव शुल्काचा भरणा केला नाही त्यामुळे त्यांना दोन दिवस शाळेत घेण्यात आलेले नाही, अशा तक्रारी पालकांकडून केल्या जात आहेत. याबाबत मुख्याध्यापकांना विचारले असता त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला. शाळेच्या विश्वस्तांनी यावर अधिक बोलणे टाळले. महाराष्ट्र शिक्षण कायदा २०११ नुसार पालक-शिक्षक संघ असणे बंधनकारक आहे. मात्र या शाळेत संघाची अद्याप नेमणूक करण्यात आलेली नाही. पालक-शिक्षक संघाची समिती गठित करून मगच त्यानुसार नियमाप्रमाणे शुल्कवाढ करण्यात यावी. आम्ही ती करण्यास तयार आहोत असे पालकांनी सांगितले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Apr 2015 रोजी प्रकाशित
‘रॉयल इंटरनॅशनल’ शाळेच्या शुल्कवाढीवरून पालक संतप्त
डोंबिवली पूर्वेतील पीएनटी कॉलनी परिसरातील ‘रॉयल इंटरनॅशनल’ या शाळेने केलेल्या शुल्क वाढीविरोधात शेकडो विध्यार्थी आणि पालकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
First published on: 18-04-2015 at 12:20 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parents angry over fees hike in royal international school