उल्हासनगर महापालिकेतील विविध विभागात सुरू असलेल्या विकासकामांची, त्यांच्यावर खर्च होत असलेल्या निधीची माहिती शहरातील एका सुज्ञ नागरिकाने माहितीच्या अधिकारात मागवली होती. मागील वर्षभर ही माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. राज्य माहिती आयुक्तांकडे याप्रकरणी तक्रार दाखल होताच टाळाटाळ करणाऱ्या या अधिकाऱ्याला दंड ठोठावण्यात आला.
उल्हासनगर शहरातील एक उच्चपदस्थ बँक अधिकारी मुकेश भाटिया यांनी गेल्या वर्षी जानेवारीमध्ये उल्हासनगर पालिकेतील सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभाग आणि जवाहरलाल नेहरू नागरी पुनरूत्थान अभियानांतर्गत किती कामे सुरू आहेत. त्या कामांसाठी किती निधी उपलब्ध आहे. प्रकल्पांवर किती खर्च झाला आहे. जवाहरलाल नेहरू योजनेतील किती निधी पाणीपुरवठा विभागाकडे वळता करण्यात आला आहे, अशी माहिती मागवली होती. महापालिकेतील अधिकाऱ्यांनी भाटिया यांना याबाबतची कोणतीही माहिती दिली नाही, तसेच अभिलेखात माहिती मिळत नसल्याचे बेजबाबदार उत्तर दिले.  
मुकेश भाटिया यांनी महापालिकेकडून उत्तर मिळत नसल्याने राज्य माहिती आयुक्त थँक्सी थेकेकरा यांच्याकडे आव्हान अर्ज दाखल केला. अर्जात माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्याला दंड करावा. माहिती विनामूल्य मिळावी, अशी मागणी केली. थेकेकरा यांनी याप्रकरणी तक्रारदार भाटिया यांना विनाविलंब दोनशे पानांची माहिती विनामूल्य उपलब्ध करून द्यावी. भरपाई म्हणून भाटिया यांना पाचशे रुपये पालिकेच्या अर्थसंकल्प तरतुदीतून धनादेशाद्वारे घरपोच देण्यात यावेत, असे आदेश दिले आहेत.

माहिती अधिकार कार्यकर्ता खंडणी मागताना अटकेत
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेतील गैरव्यवहाराची अनेक प्रकरणे माहिती अधिकाराच्या माध्यमातून उघड करून नेहमीच प्रसिद्धीचा झोत स्वत:कडे ठेवणारे माहिती अधिकार कार्यकर्ते नरसिंह देशमुख यांना एका व्यापाऱ्याकडून दीड लाख रुपयांची खंडणी घेताना महात्मा फुले पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. कल्याणमधील मल्हारनगर भागात एका जवाहिऱ्याने केलेल्या बांधकामाची तक्रार देशमुख यांनी पालिकेच्या क प्रभागात केली आहे. ही तक्रार मागे घेण्यासाठी नरसिंह देशमुख यांनी व्यापाऱ्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली होती. व्यापाऱ्याने ही माहिती पोलिसांना दिली होती.