डोंबिवली- डोंबिवलीतील टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाला वाणिज्य शाखेचे पदवी महाविद्यालय सुरू करण्याची मंजुरी मुंबई विद्यापीठाने दिली आहे. या महाविद्यालयात प्रथम वर्ष वाणिज्य प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ ही डोंबिवलीतील जुनी शिक्षण संस्था आहे. दहावीनंतर या संस्थेने कनिष्ठ महाविद्यालय, गुरुकुल शाळा, परदेशी भाषा शिकवणारे भाषावर्धिनी प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. या सर्व शाखांचा डोंबिवली परिसरातील विद्यार्थी लाभ घेत आहेत. डोंबिवली परिसरातील विद्यार्थ्यांना शहरात सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्नशील असलेल्या टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या व्यवस्थापनाने गेल्या दोन वर्षापासून संस्थेत वाणिज्य महाविद्यालय सुरू करण्यासाठी मुंबई विद्यापीठात प्रयत्न चालविले होते. या प्रयत्नांना यश येऊन मुंबई विद्यापीठाने टिळकनगर शिक्षण संस्थेला पदवी वाणिज्य महाविद्यालय सुरू करण्यास मंजुरी दिली आहे, अशी माहिती टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह आशीर्वाद बोंद्रे यांनी दिली.
हेही वाचा <<< कल्याण, डोंबिवलीतील रस्ते पाण्याखाली; टिटवाळा येथील काळू नदीवरील रुंदे पूल पाण्याखाली
डोंबिवलीतील टिळकनगर मधील टिळकनगर शाळेच्या शैक्षणिक संकुलात हे महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. या महाविद्यालयात प्रथम वर्ष वाणिज्य प्रवेशासाठीची प्रक्रिया व्यवस्थापनाने सुरू केली आहे. इच्छुकांनी महाविद्यालयात प्रत्यक्ष येऊन किंवा संस्थेच्या ९८६७२६८९६९ या मोबाईल क्रमांकावर सकाळी ११ ते संध्याकाळी सहा वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन कार्यवाह आशीर्वाद बोंद्रे यांनी केले आहे. प्रथम वर्ष वाणिज्य अभ्यासक्रमासाठी पुरेसी विद्यार्थी संख्या झाल्यावर तात्काळ या अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू केले जाणार आहेत, असे बोंद्रे यांनी सांगितले. डोंबिवलीत आतापर्यंत पाच ते सहा पदवी महाविद्यालये आहेत. त्यात टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या पदवी महाविद्यालयाची भर पडली आहे. यामुळे विद्यार्थ्यांची वाणिज्य अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची धावाधाव कमी होणार आहे.