ठाणे : भिवंडीतील कशेळी खाडीत एकजण बुडाला असल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे. या व्यक्तीचे शोधकार्य भिवंडी अग्निशमन दलाचे जवान, ठाणे अग्निशमन दलाचे जवान आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांच्या मदतीने गेले सात ते आठ तासांपासून सुरू आहे, अशी माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.

राजेशकुमार कैलासनाथ दुबे (५३) असे कशेळी खाडीत बुडालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते ठाणे शहरातील काजूवाडी परिसरात राहतात. बाळकुम अग्निशमन केंद्राला मिळालेल्या माहितीनुसार राजेशकुमार दुबे यांनी रविवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास कशेळी खाडीत उडी मारली.

ही माहिती मिळताच, ठाणे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, नारपोली पोलिस कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान ०१- बस वाहनासह, ठाणे अग्निशमन दलाचे जवान ०१- फायर वाहनासह, भिवंडी अग्निशमन दलाचे जवान ०१- फायर वाहनासह आणि एक बोटसह घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनास्थळी बोटीच्या साह्याने खाडीमध्ये भिवंडी अग्निशमन दलाचे जवान, ठाणे अग्निशमन दलाचे जवान आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांच्या मदतीने गेले सात ते आठ तासांपासून शोधकार्य सुरू आहे.