कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून निर्णय रद्द

कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील परिसर अस्वच्छ होत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्यामुळे पालिका प्रशासनाने भटके प्राणी, कबुतर आणि इतर पक्ष्यांसाठी रस्त्यावर खाद्यपदार्थ तसेच धान्य टाकणाऱ्यांकडून एक हजार रुपये दंड वसूल करण्याचा निर्णय तीन महिन्यांपूर्वी घेतला होता. या निर्णयाविरोधात प्राणीप्रेमींनी केलेल्या तक्रारींची दखल केंद्र सरकारच्या भारतीय प्राणी विकास मंडळाने घेतली असून या मंडळाच्या आदेशानंतर पालिकेने हा निर्णय रद्द केला आहे. तसेच भटके प्राणी आणि पक्ष्यांना खाद्यपदार्थ टाकण्यासाठी पालिकेने जागा निश्चित केल्या असून तिथेच खाद्यपदार्थ टाकण्याचे आवाहन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत अनेक रहिवासी, व्यापारी भटके प्राणी, कबुतर तसेच इतर पक्ष्यांसाठी रस्त्यावर धान्य तसेच खाद्यपदार्थ टाकतात. पक्ष्यांच्या विष्ठेमुळे परिसर अस्वच्छ होण्याबरोबरच शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. याबाबत तक्रारी येऊ लागताच पालिका प्रशासनाने तीन महिन्यांपूर्वी एक आदेश काढला होता. त्यामध्ये भटके प्राणी, कबुतर आणि इतर पक्ष्यांसाठी रस्त्यावर खाद्यपदार्थ तसेच धान्य टाकणाऱ्यांना एक हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले. या निर्णयाविरोधात शहरातील काही पक्षी, प्राणीप्रेमींनी जिल्हा पशुधन विकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची मंडळाने गंभीर दखल घेऊन राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पशुधन विकास अतिरिक्त आयुक्तांना पत्र पाठविले. या पत्रात पक्ष्यांना, भटक्या प्राण्यांना खाद्यपदार्थ न घालणे ही एक प्रकारची क्रूरता आहे. अशाप्रकारे त्यांचा मुक्त जगण्याचा, कुठेही खाण्याचा अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नाही, असे म्हटले आहे.

सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ टाकल्यास दंड आकारण्याचा निर्णय रद्द केला आहे. धान्य टाकण्यासाठी प्रभाग क्षेत्रांच्या नियंत्रणाखाली जागा निश्चित केल्या आहेत. धान्य पक्ष्यांनी खाल्ल्यानंतर त्या जागेची स्वच्छता करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी, मुख्य रस्त्यावर कोणीही धान्य, खाद्यपदार्थ टाकू नयेत. पालिकेने निश्चित केलेल्या जागांचा वापर करावा.

– रामदास कोकरे, उपायुक्त, घनकचरा विभाग

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pigeons penalized throwing grain ssh
First published on: 26-06-2021 at 00:31 IST