ठाण्यात खड्डे भरणीला सुरुवात

महापालिका क्षेत्रातील अंतर्गत तसेच मुख्य रस्त्यांवर बुजविलेले खड्डे गेल्या आठवडय़ात झालेल्या अवकाळी पावसामुळे पुन्हा उखडल्याचे चित्र होते.

महापालिकेला उशिराने जाग; रस्त्यांना डांबराचे लेपण

ठाणे : महापालिका क्षेत्रातील अंतर्गत तसेच मुख्य रस्त्यांवर बुजविलेले खड्डे गेल्या आठवडय़ात झालेल्या अवकाळी पावसामुळे पुन्हा उखडल्याचे चित्र होते. तर, काही ठिकाणी खड्डेभरणीची कामेच केलेली नसल्यामुळे ठाणेकरांना खड्डय़ांमधून प्रवास करावा लागत होता. यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटू लागताच पालिका प्रशासनाने गेल्या दोन दिवसांपासून शहरात पुन्हा खड्डेभरणीची कामे हाती घेतली आहेत. रस्त्यावरील खड्डे डांबराच्या साहाय्याने बुजविले जात आहेत.

 यंदाच्या पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली. शहरातील मार्गांवर जागोजागी खड्डे पडले. खड्डय़ांच्या मुद्दय़ावरून पालिका प्रशासनावर टीका होत आहे. यानंतर पालिका प्रशासनाकडून खड्डेभरणीची कामे करण्यात आली होती. राडारोडाच्या साहाय्याने हे खड्डे भरण्यात आले होते. परंतु पाऊस पडताच बुजविलेले खड्डे उखडले होते.

 सततच्या पावसामुळे डांबराच्या साहाय्याने खड्डेभरणीची कामे करणे शक्य होत नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत होते. पाऊस थांबताच पालिकेने डांबराच्या साहय्याने खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले होते. या कामात पुन्हा पावसाचे व्यत्यय आला. पाऊस पूर्णपणे थांबताच पालिकेने शहरात अनेक ठिकाणी खड्डे बुजविण्याची कामे पुन्हा हाती घेतली. त्यात अनेक ठिकाणी डांबराच्या साहाय्याने खड्डे बुजविले होते. तर, काही ठिकाणी खड्डेभरणीची कामे केलीच नव्हती. असे असतानाच गेल्या आठवडय़ात झालेल्या अवकाळी पावसामुळे रस्त्यांवर बुजविलेले खड्डे पुन्हा उखडले होते.

नौपाडय़ातील मल्हार सिग्नल चौक, नितीन कंपनी चौक, तीन हात नाका, कॅडबरी सिग्नल, इंदिरानगर, ज्ञानेश्वरनगर, सावरकरनगर, लोकमान्यनगर, बाळकुम जकात नाका सिग्नल परिसर, शहरातील महामार्गालगतचे सेवा रस्ते, घोडबंदर सेवा रस्ते, साकेत परिसर यांसह शहराच्या विविध भागांतील रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडले होते.

त्याबाबत नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटताच पालिका प्रशासनाने गेल्या दोन दिवसांपासून शहरात पुन्हा खड्डेभरणीची कामे हाती घेतली आहेत. या संदर्भात महापालिकेचे नगरअभियंता अर्जुन अहिरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी खड्डेभरणीची कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात आल्याचे सांगितले. गोखले रोड, बाळकुम तसेच शहराच्या विविध भागातील रस्त्यांवर खड्डे बुजविण्यात आले असून कॅडबरी जंक्शनलगतच्या सेवा रस्त्यावरील खड्डेभरणीचे काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pit filling road work ysh

ताज्या बातम्या