कल्याण- पर्यावरण दिनाचे औचित्य साधून डोंबिवलीतील शबरी सेवा समितीच्या माध्यमातून आदिवासी, दुर्गम भागातील शाळकरी मुलांनी गाव परिसरातील डोंगर, माळरान, रस्त्यांच्याकडेला विविध झाडांच्या बियांचे रोपण केले. पाऊस सुरू झाल्यानंतर या बियांना अंकुर फुटल्यानंतर या रोपांचे संवर्धन करण्यात येणार आहे, असे शबरी सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

नष्ट होत चाललेली जंगले, वाढते उष्णतामान, रस्त्यांच्या कडेला झाडे नसल्याने प्रवाशांचे होणारे हाल याचा विचार करून पर्यावरणदिनी कोणतेही सभागृहातील, मंचकीय कार्यक्रम न घेता प्रात्यक्षिकासह दरवर्षी पर्यावरण दिन शबरी सेवा समितीतर्फे साजरा केला जातो. दरवर्षी जानेवारी ते मे या कालावधीत आंबे, महुआ, कुंभ, काजू, गुलमोहर, फणस, जांभळे, करंज या बारही महिने हिरवेगार राहणाऱ्या झाडांच्या बिया जमा केल्या जातात. या बिया वाळवून त्या पावसाळ्याच्या तोंडावर पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शबरी सेवा समितीतर्फे आदिवासी, दुर्गम भागातील मुलांना पर्यावरणाचे महत्व सांगून या मुलांच्या हातात या बिया दिल्या जातात. त्या परिसरातील रस्ता, गावे, ओसाड माळरानावर लावल्या जातात, असे शबरी सेवा समितीचे प्रमोद करंदीकर यांनी सांगितले.

हेही वाचा >>>रखडलेल्या प्रकल्पांची लवकरच पूर्तता; मुख्यमंत्र्यांची ग्वाही, ठाण्यातील ‘क्लस्टर’ योजनेचा आरंभ

आदिवासी वाड्या-पाड्यावरील मुले आनंदाने या उपक्रमात सहभागी होतात. पाऊस पडल्यानंतर या बियांना कोंब फुटतात. ज्या मुलांनी ही झाडे लावली आहेत, त्या मुलांनी ती झाडे दत्तक घेऊन त्यांचे संगोपन करायचे, असा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाला समितीचे महिला, पुरूष कार्यकर्ते सहकार्य करतात. अशाप्रकारची बियांपासूनची झाडे आता आंबा, जांभळे फळे देत आहेत. परिसरातील आदिवासी त्याचा आस्वाद घेतात, असे समिती कार्यकर्त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.