अंबरनाथ: अंबरनाथ आणि उल्हासनगर स्थानकादरम्यान एका धावत्या लोकलवर प्लास्टिक बाटली आदळल्याने सोमवारी घबराट पसरली. दुपारी साडे १२च्या सुमारास अंबरनाथहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलच्या महिला डब्यावर ही बाटली आदळली. या घटनेची माहिती लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास केला. लहान मुले खेळत असताना खडीने भरलेली बाटली दारावर आदळल्याने हा प्रकार झाल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे. कोणत्याही प्रवासाला इजा झाली नाही.

सोमवार दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी अंबरनाथ स्थानकातून सुटलेली मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल स्थानकातून काही अंतरावर गेली असता लोकलच्या मुंबई दिशेच्या महिला डब्याच्या दरवाजाजवळ एक प्लास्टिकची बाटली येऊन आदळली. या बाटलीमुळे त्या भागात धूळ पसरली. या प्रकारानंतर दारात असलेल्या दोन महिला घाबरल्या. या दोन्ही महिला उल्हासनगर स्थानकात उतरल्यानंतर तात्काळ या प्रकाराची माहिती लोहमार्ग पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने या प्रकाराची खातरजमा करण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. या परिसरातील झोपडपट्टी परिसरात रेल्वे रुळाच्या बाजूला काही लहान मुले खेळत होती. प्लास्टिक बाटल्यांमध्ये खडी टाकून हवेत उडण्याचा खेळ खेळत असताना त्यातील एक बाटली  लोकलच्या डब्यावर आदळली आणि त्यामुळे डब्याच्या दारात धूळ पसरली. यातील तीनही मुले अनुक्रमे नऊ, आठ आणि सहा वर्षांची होती, अशी माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्ही. डी. शार्दूल यांनी दिली.