ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कोपरी भागातील पोलीस ठाण्याच्या उभारणीचा मार्ग अखेर चार वर्षानंतर मोकळा झाला आहे. कोपरी येथील आनंदनगर जकातनाकाजवळील सीएनजीपंप जवळ राज्य सरकारने भूखंड मंजूर केला आहे. सध्या कोपरी पोलिसांना हक्काची इमारत नसल्याने तात्पुरत्या जागेत कोपरी पोलिसांचे कामकाज सुरू आहे. परंतु या पोलीस ठाण्यात कोठडी नसल्याने, अपुरी जागा यामुळे अनंत अडचणींचा सामना पोलिसांना करावा लागत आहे.

कोपरी येथील मीठबंदर भागात कोपरी पोलीस ठाणे होते. परंतु या पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांना बसण्यास पुरेशी जागा होत नव्हती. पावसाळ्यातही पोलीस ठाण्यात छप्पर गळत असे. पोलीस ठाण्याच्या भींतीही जीर्ण झाल्या होत्या. त्यामुळे कोपरी पोलीस ठाण्यास नव्याने बांधण्याचा निर्णय गृह विभागाकडून घेण्यात आला होता. दुर्घटना निर्माण होऊ नये म्हणून जीर्ण पोलीस ठाणे बंद करून पोलिसांना वन विभागाच्या जागेत तात्पुरते स्थलांतरीत करण्यात आले आहे. परंतु ही जागाही पोलिसांसाठी पुरेशी नाही. चार वर्षांपासून भूखंडाचा शोध राज्य सरकारकडून सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागील सरकारमध्ये पालकमंत्री असताना त्यांनी येथील पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी पाठपुरावा केला होता. परंतु विविध तांत्रिक कारणामुळे पोलीस ठाण्यास जागा उपलब्ध होत नव्हती. याचा परिणाम कोपरी पोलिसांना सहन करावा लागत होता. या तात्पुरत्या पोलीस ठाण्यात पोलीस कोठडीही नाही. त्यामुळे अटकेत असलेल्या आरोपींना वागळे इस्टेट येथे न्यावे लागत होते. कामानिमित्ताने कोपरी पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना बसण्यासही पुरेशी जागा नव्हती. त्यामुळे नागरिकांचेही हाल होते. अखेर आनंदनगर जकातनाका येथील सीएनजी पंपाजवळील ५०० चौ. मी. शासकीय जमीन उपलब्ध झालेली आहे. येथे तीन मजली इमारत असणार आहे. त्यामुळे प्रशस्त जागा उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोपरी -पाचपाखाडी हा मतदारसंघ आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर कोपरी पोलीस ठाण्याचा मार्ग मोकळा झाल्याने पोलिसांनीही दिलासा व्यक्त केला आहे.