डोंबिवली – डोंबिवलीत रस्ते, पदपथ अडवून व्यवसाय करणाऱ्या हातगाडी चालक, रिक्षा चालक यांच्याविरुध्द रामनगर, विष्णुनगर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमुळे डोंबिवली रेल्वे स्थानक भागात रिक्षा वाहनतळ सोडून व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांना चाप बसला आहे. पदपथ अडवून हातगाडीवर खाद्य पदार्थ विक्री करणारे विक्रेते या कारवाईमुळे अस्वस्थ आहेत.

डोंबिवली रेल्वे स्थानक भागात अनेक रिक्षा चालक रिक्षा वाहनतळ सोडून रेल्वे स्थानकाच्या प्रवेशव्दारावर येऊन नियमबाह्यपणे प्रवासी वाहतूक करतात. या रिक्षांमुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. डोंबिवली पश्चिमेत विष्णुनगर भागात हा प्रकार नेहमीच प्रवाशांना पाहण्यास मिळतो.

हेही वाचा >>>कल्याण, डोंबिवलीत घर खरेदीदारांची फसवणूक

विष्णुनगर पोलीस ठाण्याचे हवालदार किरण फड आणि त्यांचे सहकारी डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक भागात गस्त घालत होते. ठाकुरवाडी भागात राहणाऱ्या एक रिक्षा चालकाने आपली रिक्षा डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ वाहतुकीला अडथळा होईल अशा पध्दतीने उभी केली होती. या रिक्षा चालकाविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

डोंबिवली पूर्वेतील आयरेगाव बालाजी गार्डन भागात एक भंगार विक्रेता वर्दळीच्या रस्त्यावर भंगार सामानाची हातगाडी उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करत होता. ही बाब रामनगर पोलीस ठाण्यातील गस्तीवरील हवालदार प्रसाद चोरमुले आणि सहकाऱ्यांच्या निदर्शनास येताच पोलिसांनी भंगार विक्रेत्या विरुध्द गुन्हा दाखल केला.

हेही वाचा >>> कल्याण पूर्वेत थकबाकीदारांच्या मालमत्तांना टाळे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यू आयरेगाव साईबाबा मंदिराजवळ एक वडापाव विक्रेता वर्दळीच्या रस्त्यावर हातगाडी लावून उभा होता. हातगाडीवर सिलिंडरला जोडलेली शेगडी होती. विक्रेत्याने मानवी जीवितास धोक होईल अशा ठिकाणी सिलिंडर, शेगडी ठेवली म्हणून हवालदार सुभाष नलावडे यांनी वडापाव विक्रेत्या विरुध्द गुन्हा दाखल केला. डोंबिवली रेल्वे स्थानकामुळे सार्वजनिक ठिकाणी गॅस सिलिंडर, शेगडीचा वापर करून चहा विक्री व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्या विरुध्द रामनगर पोलीस ठाण्याचे हवालदार वेणु कळसे यांनी गुन्हा दाखल केला. राजाजी रस्त्यावरील कुडाळ देशकर सभागृहाच्या बाजुला दुरुस्तीसाठीची वाहने रस्त्यावर उभी करून वाहतुकीस अडथळा आणला म्हणून हवालदार वेणु कळसे यांनी कार्यशाळा चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला. दत्तनगर चौकात हातगाडीवर सिलिंडरच्या माध्यमातून शेगडी पेटवून चायनिज पदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्या विरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी रस्ते, पदपथ अडविणाऱ्या, खाद्य पदार्थ विक्रीच्या ठिकाणी ज्वालाग्रही सामान ठेवणाऱ्या विक्रेते, चालकांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच, पालिकेच्या फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर, ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत यांनी फेरीवाल्यांना हटविण्याची जोरदार मोहीम सुरू केली आहे. रस्ते, पदपथ फेरीवाला मुक्त झाल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.