एका कंपनीच्या नावाने बोगस धनादेश तयार करून बँकेला २४ कोटींचा गंडा घालण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे. सचिन प्रकाश साळस्कर (२९, रा. विरार), उमर फारूक (३९, रा. विरार), अनेक अनिल ओतारी (३३, रा. विरार), मजहर मोहम्मद हुसेन खान (४०, रा. विरार), हरिश्चंद्र काशिनाथ कडव (रा. वांगणी), नितीन दिलीप शेलार (४०, रा. वांगणी) आणि अशोक बिहारीराम चौधरी (५१, रा. महेश अपार्टमेंट, गोग्रासवाडी, नामदेव पथ, डोंबिवली-पूर्व) अशी ७ जणांचा यात समावेश आहे.

सचिन साळस्कर, उमर फारूक आणि अनेक ओतारी या तिघांना कल्याण न्यायालयाने ६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित चौघांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांची रवानगी कल्याणच्या आधारवाडी तुरूंगात करण्यात आली आहे. या संदर्भात एचडीएफसीच्या कल्याण-शिळ मार्गावर असलेल्या दावडीतील शाखेचे मॅनेजर विशाल रामप्रसाद व्यास (४५) यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी भादंवि कलम ४६७, ४६८, ४६९, ४२०, ५११, ३४ अन्वये ऑक्टोबर २०२१ रोजी गुन्हा दाखल केला होता.

“धनादेशावर असणाऱ्या सह्या देखील तंतोतंत जुळल्या”

या गुन्ह्यातील ७ आरोपींनी इंडस टॉवर प्रा. लि. कंपनीच्या मालकीचा २४ कोटी रुपयांचा बोगस धनादेश तयार केला. हा धनादेश बँकेत दाखल केला. विशेष म्हणजे त्या धनादेशावर असणाऱ्या सह्या देखील तंतोतंत जुळत असल्याचे बँक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. या गुन्ह्याच्या तपासात गुन्हा उघड करून आतापर्यंत एकूण ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

आरोपींची फसवणुकीची खास ‘मोडस ऑपरेंडी’

वरिष्ट निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सह्यय्य्क पोलीस निरिक्षक श्रीकृष्ण गोरे, विरार पोलीस ठाण्याचे जमादार सुरेंद्र शिवदे, दिपक जगदाळे यांनी केलेल्या तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, हे आरोपी टोळीने काम करतात. यात खातेधारकांची बँक महिती गोळा करणे, त्यावर असणारा बॅलन्स, खातेधारकाच्या सहीचे फोटो, वगैरे माहिती घेत असत. त्यानंतर त्या माहितीच्या आधारे बोगस धनादेश बनवण्याचे काम करत.

हेही वाचा : कोल्हापुरात बिटकॉईनमधून १८० टक्के परताव्याची जाहिरात, ५८ लाखांनंतर पुन्हा २० लाखांच्या फसवणुकीचा प्रकार उघड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५० पेक्षा जास्त बोगस चेक बनविल्याचे तपासात निष्पन्न

एक साधा चेक घेऊन त्यावरील खाते नंबर खोडून, नवीन खाते नंबर प्रिंट केला जाई. जमविलेल्या माहितीच्या आधारे त्यावर डुप्लिकेट सही केली जात होती. त्यानंतर हा धनादेश वापरून अकाऊंट टू अकाऊंट पैसे पाठविले जात असत. पैसे ट्रान्सफर करून घेण्यासाठी देखील डमी अकाऊंटचाच वापर केला जात असे. अशाप्रकारे आतापर्यंत या आरोपींनी ५० पेक्षा जास्त बोगस चेक बनविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या ७ जणांनी मिळून आतापर्यंत किती कंपन्या, बँका आणि व्यक्तींची अशारितीने फसवणूक केली आहे याचा सपोनि श्रीकृष्ण गोरे अधिक तपास करत आहेत.