किशोर कोकणे

महाविद्यालयातील प्रेमप्रकरण कानावर आल्याने कुटुंबीयांनी तिला घराबाहेर काढल्यावर एका तरुणाने आश्रय दिला. त्याने तिच्याशी विवाहही केला. मात्र, नंतर तिचे अन्य एका तरुणाशी प्रेमसंबंध जुळले. प्रेमाच्या आड येणाऱ्या पतीची त्या दोघांनी हत्या केली आणि अपघाताचा बनाव रचला. मात्र, दोघेही फरार झाल्याने पोलिसांचा संशय बळावला आणि त्यातून हत्येचा उलगडा झाला. ठाण्यात घडलेल्या क्रूर हत्येविषयी..

रायगड जिल्ह्य़ातील नागोठणे गावात राहणारी प्रिया (२७) महाविद्यालयात शिकत असताना तिचे एका तरुणावर प्रेम जडले होते. याबाबत कुटुंबीयांना माहिती मिळाल्याने त्यांनी तिला घराबाहेर काढले. कामाच्या शोधात ती ठाण्यात पोहचली. एका कंपनीत काम करताना तिची एका मुलीशी मैत्री झाली. प्रियाचे ठाण्यात कोणीच नव्हते आणि राहण्यासाठी घरही नव्हते. त्यामुळे मैत्रिणीने तिला स्वत:च्या घरी नेले. मैत्रिणीचा भाऊ गोपी नाईक याच्याशी प्रियाची मैत्री झाली. तिचे वागणे, बोलणे आणि स्वभाव पाहून गोपीच्या कुटुंबीयांनी त्याचे आणि प्रियाचे लग्न लावून दिले. लग्नानंतर त्यांना एक मुलगी झाली. गोपी हा महापालिकेत सफाई कामगार होता. त्याला महापालिकेकडून घोडबंदर भागातील श्रमसाफल्य इमारतीत घर मिळाल्यामुळे तो कुटुंबासह तिथे राहू लागला. लग्नानंतर नऊ वर्षे त्यांचा संसार सुखात सुरू होता.

दोन वर्षांपूर्वी कर्जत भागात राहणाऱ्या महेश कराळे याची आणि प्रियाची फेसबुकवर ओळख झाली. या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. दोघांचे मोबाइलवरील संभाषण वाढू लागले. याबाबत कुणकुण लागल्याने गोपी आणि प्रिया यांच्यात खटके उडू लागले. तो तिला मारहाण करू लागला. मारहाणीबाबत तिने महेशला सांगितले. त्यानंतर महेश याने गोपीला संपविण्याचा कट रचला.

त्याने कर्जतमधील कोषाणे गावातील डॉक्टरकडून झोपेच्या गोळ्यांचे नाव लिहून घेतले. माटुंग्यातील औषधांच्या दुकानातून झोपेच्या ३५ गोळ्या आणि एक रिकामे इंजेक्शन घेतले. २८ डिसेंबरला महेश ठाण्यात आला. त्याने फळांचा रसही विकत घेतला. प्रियाने गोपीच्या रात्रीच्या जेवणात १५ झोपेच्या गोळ्या मिसळल्या. मात्र, गोपीवर गोळ्यांचा परिणाम झाला नाही. त्यामुळे प्रियाने फळांच्या रसामध्ये १५ आणि दुधात पाच गोळ्या मिसळून ते गोपीला दिले. त्याला गुंगी येऊ लागताच महेश घरात शिरला. त्याने गोपीच्या कमरेवर फिनायल भरलेले इंजेक्शन दिले आणि लोखंडी रॉडने गोपीच्या डोक्यावर प्रहार केला आणि गळा आवळून त्याचा खून केला.

दोघांनी गोपीचा मृतदेह तिसऱ्या मजल्यावरून खाली खेचत आणला. त्यामुळे संपूर्ण घरात आणि इमारतीच्या जिन्यावर रक्त पसरले होते. यादरम्यान गोपी यांची सात वर्षांची मुलगी घरात झोपली होती. दोघांनी गोपीचा मृतदेह दुचाकीवर ठेवला. महेश पुढे बसला आणि प्रिया मागे बसली. त्यांनी गोपीचा मृतदेह दोघांच्या मध्ये ठेवला होता. गायमुख ते माजीवडा हा ५ किलोमीटरचा प्रवास दुचाकीवर करताना गोपीचे पाय रस्त्यावर घासले जात होते. मध्येच प्रियाच्या हातून मृतदेह निसटला आणि खाली पडला.

दोघांनी मृतदेह पुन्हा दुचाकीवर ठेवण्याचा प्रयत्न केला. पण, ते त्यांना शक्य झाले नाही. अखेर महेशने एका रिक्षा थांबविली. त्यामध्ये मृतदेह टाकला. प्रियाला रिक्षातून येण्यास सांगितले, तर महेश रिक्षाच्या मागून दुचाकी घेऊन निघाला. प्रियाने रिक्षा ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात नेली. तिथे अपघात झाल्याचे सांगितले. डॉक्टरांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. मात्र, तोपर्यंत या दोघांनी रुग्णालयातून पळ काढला होता. महेश आणि प्रिया पुन्हा गायमुखला आले. घरात मुलगी झोपली होती. महेशने सांडलेले रक्त पुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते पुसले जात नव्हते. त्यानंतर या दोघांनी मुलीला तसेच घरात सोडून पोबारा केला.

२९ डिसेंबरला गोपी यांची मुलगी झोपेतून उठली, त्या वेळेस संपूर्ण घरात रक्त सांडलेले तिने पाहिले. तिने हे शेजाऱ्यांना सांगितले. त्याच वेळी पोलीस गोपीच्या घरी आले. खून झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली कासारवडवली पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. ढोले, पोलीस निरीक्षक वैभव धुमाळ, तत्कालीन पोलीस निरीक्षक नासीर कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक संतोष धावडे, विनायक निंबाळकर, साहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास टोकले, पोलीस कर्मचारी राहुल दबडे यांच्या पथकाने दोन दिवसांत दोघांना शोधून काढले. हे दोघे माथेरानला गेले होते. पथकाने त्यांना अटक केली. सध्या हे दोघेही कारागृहात आहेत. या घटनेमुळे ती मुलगी मात्र अनाथ झाली.