पोलीस निष्क्रियतेविरोधातील पोलिसाच्या बंडाचे तीव्र पडसाद

वसईतील पोलिसाने पोलिसांच्या निष्क्रियतेविरोधात बंड पुकारल्याचे वृत्त ‘लोकसत्ता वसई-विरार’मध्ये प्रसिद्ध होताच त्याचे तीव्र पडसाद उमटले. हे बंड करणाऱ्या साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गोसावी यांना विविध स्तरातून पाठिंबा मिळत असून भाजपने या प्रकरणाचा मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. गोसावी यांनी केलेल्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी वसईच्या विभागीय पोलीस उपअधीक्षकांमार्फत चौकशी समिती नेमण्यात आली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत गोसावी यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांनी वृत्त प्रसिद्ध होताच शहरातील वेश्या व्यवसायांच्या अड्डय़ांवर छापे टाकायला सुरुवात केली आहे.

वसईतील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधात्मक शाखेत कार्यरत असणारे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गोसावी यांनी वसईच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून वसईतील अनैतिक धंद्यावर कारवाई करू दिली जात नसल्याची कैफियत मांडली होती. वरिष्ठ पोलीस याकडे दुर्लक्ष करतात आणि कारवाई करू देत नाही, असा खळबजनक आरोप त्यांनी या पत्रात केला होता. याच पत्रात अमली पदार्थाचे जाळे कसे खोलवर पसरले आहे आणि तरुण मुलींना वेश्या व्यवसायात कसे लावले जात आहे याची माहिती दिली होती. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता वसई-विरार’मध्ये प्रसिद्ध होताच खळबळ उडाली. वसई-विरारमधील अनेकांनी गोसावी यांना पाठिंबा दिला आहे. वसईतील तरुण सामाजिक कार्यकर्ते सचिन मेंडीस यांनी हे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. भाजपनेही या प्रकरणााची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणााची पक्षाच्या पातळीवर मुख्यमंत्र्यांकडे कारवाई करण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.  पोलिसांचा या अनैतिक धंद्यांना छुपा पाठिंबा असतो. या प्रकरणाला जाहीर वाचा फोडल्याबद्दल गोसावी यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत, असे भाजपचे वसई-विरार जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी सांगितले.

अनैतिक धंद्यावर पोलिसांची कारवाई सुरू

वसईत वेश्या व्यवसाय सुरू असल्याची बातमी आल्यानंतर पोलिसांची धावपळ सुरू झाली. तुळींज पोलिसांनी शुक्रवारी नालासोपारा पूर्वेकडील स्थानक परिसरात असलेल्या विराज लॉजवर छापा घातला. या छाप्यात पोलिसांनी वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या चार मुलींची सुटका केली. त्यांना वेश्या व्यवसायासाठी भाग पाडणाऱ्या दोन दलाल महिलांना अटक केली, अशी माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी दिली. वसई येथे एका वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा घातला. संध्याकाळी उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.

महेश गोसावी यांनी केलेल्या तक्रारीची गंभीर दखल वरिष्ठांनी घेतली आहे. या प्रकरणातील सत्यता पडताळून दोषींवर कारवाई करण्यासाठी वसईचे विभागीय पोलीस अधीक्षक अनिल आकडे यांच्याकडे चौकशी सोपविण्यात आली आहे. या चौकशीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

योगेश कुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक