ठाणे, कल्याण : काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. पोलिसांना सतर्कचे आदेश असले तरी ठाणे, डोंबिवली आणि कल्याण या रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी उभारण्यात आलेल्या यंत्रणाची अवस्थाच बिकट अवस्थेत आहे. ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेस बसविलेली प्रवाशांचे सामान, वस्तू तपासणी यंत्रणाच गायब झाली आहे. तर कल्याण स्थानकाच्या पश्चिमेस असलेली यंत्रणा वापरलीच जात नाही. डोंबिवली स्थानकात यंत्रणांच उपलब्ध नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पोलीस बळावर प्रवासी सुरक्षितता किती प्रमाणात अवलंबून ठेवणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

काश्मीरमध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात डोंबिवलीतील तीन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. असे असले तरी हे सतर्कतेचे आदेश केवळ कागदोपत्रीच आहेत का असाही प्रश्न निर्माण होत आहे. २६ -११ चा दहशदवादी हल्ला झाल्यानंतर रेल्वे स्थानकांमध्ये सुरक्षा वाढविल्याचा दावा केला जात होता. परंतु महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांमध्येही सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे.

ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला रेल्वे सुरक्षा दलाने सुरक्षा कारणास्तव वस्तू तपासणी यंत्रणा, मेटल डिक्टेर अशा तपासणी यंत्रणा बसविल्या होत्या. परंतु पूर्वेस सॅटीस प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यामुळे ही यंत्रणा काढण्यात आली. त्यामुळे आता ठाणे रेल्वे स्थानकात बिनदिक्कत कोणीही प्रवेश करू शकतो. डोंबिवली रेल्वे स्थानकातही कोणतीही सुरक्षा यंत्रणा बसविण्यात आलेली नाही. तर कल्याण रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस प्रवाशांचे वस्तू तपासणी यंत्रणा बसविण्यात आली आहे. परंतु ही यंत्रणा धुळखात आहे. तर पूर्वेच्या दिशेने कोणीही यंत्रणा बसविण्यात आली नाही. ठाणे, डोंबिवली आणि कल्याण रेल्वे स्थानकातून लाखो प्रवासी प्रवास करत असतात. परंतु यंत्रणा अपुऱ्या असल्याने येथील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील ऐरणीवर आला आहे. कल्याण आणि ठाणे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतुक सुरु असते. त्यामुळे एखादी दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे.

याबाबत रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाणे रेल्वे स्थानकातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारले असता, त्याने सांगितले की, आमचा स्थानक परिसरात २४ तास बंदोबस्त असतो. ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूनर्विकासाचे काम सुरू आहे. त्यामुळे येथील यंत्रणा काढण्यात आली आहे. सॅटीस प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यास पुन्हा यंत्रणा बसविली जाईल.

ठाणे, कल्याणसह इतर महत्त्वाच्या स्थानकात प्रवासी सुरक्षेसाठी यंत्रणा बसविण्यात आली होती. त्याचा आता कोणताही उपयोग होताना दिसत नाही. ज्यावेळी नागपूरमध्ये हिंसाचार झाला त्याचवेळी प्रवासी संघटनेने रेल्वे प्रशासनास पत्रव्यवहार केला होता. परंतु काहीही हालचाल झालेली दिसत नाही. एखादी मोठी दुर्घटना झाल्यास प्रशासनाला जाग येणार का?- लता अरगडे, अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था.