डोंबिवली : डोंबिवलीत सकाळ, संध्याकाळ खाडीकिनारी रहिवासी मोठय़ा संख्येने शतपावलीसाठी गर्दी करीत असल्याने ही गर्दी कमी करण्यासाठी पोलीस आणि पालिका पथकांनी गस्त मोहीम सुरू केली आहे. शहरात कठोर निर्बंध असताना रहिवासी खाडीकिनारी, मोकळ्या जागा, प्रशस्त रस्त्यांवर मुखपट्टी न घालता फिरत असल्याचे दोन दिवसांपूर्वी उघड झाले. त्यामुळे पालिका आणि पोलीस यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत.
डोंबिवली पश्चिमेत कुंभारखाणपाडा, गणेशनगर, मोठागाव रेतीबंदर, देवीचापाडा खाडीकिनारी नागरिक दररोज सकाळ, संध्याकाळ फेरफटका मारण्यासाठी गर्दी करत आहेत. अनेक उनाड तरुण या ठिकाणी दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन येऊन मौजमजा करीत असल्याचे पालिका, पोलीस पथकांच्या निदर्शनास आले आहे. रविवारी खाडीकिनारी भागातून २२५ रहिवाशांना टाळेबंदीचे नियम मोडल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची प्रतिजन चाचणी केल्यानंतर त्यामधील चार रहिवासी करोना सकारात्मक आढळून आले. हे रहिवासी करोना प्रतिबंधाचे नियम धुडकावून करोनाचा प्रसार करत असल्याने अशा विनाकारण फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय पालिका, पोलीस पथकांनी घेतला आहे. रामनगर पोलीस ठाण्यात सोमवारी दिवसभरात ७२, कल्याणमध्ये महावीर सभागृहात १९१ विनाकारण फिरणाऱ्या रहिवाशांची प्रतिजन चाचणी करण्यात आली. या चाचणीत कल्याणमध्ये सहा जण करोना सकारात्मक आढळून आले. त्यांची रवानगी पालिकेच्या करोना काळजी केंद्रात करण्यात आली. सबळ कारण असल्याशिवाय रहिवाशांनी घराबाहेर पडू नये. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील करोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी रहिवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिका, पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे.