डोंबिवली – येथील शिळफाटा रस्त्यावरील पलावा येथील एक्सपेरिया मॉलमधील एका हॉटेलमधील सेवकाने हॉटेलमध्ये भोजन करण्यासाठी आलेल्या दोन ग्राहकांना हात स्वच्छ न करता अशुध्द पाणी पिण्यास आणून दिले. हयगयीने आणि मानवी आरोग्यास घातक असे कृत्य हॉटेलमधील सेवकाने केल्याने मानपाडा पोलीस ठाण्यातील हवालदाराच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित सेवकावर सोमवारी गुन्हा दाखल केला. अली उर्फ कादरी बुबाळी जाहीद हुसेन (२८) असे गुन्हा दाखल झालेल्या सेवकाचे नाव आहे. ते पलावा भागातील एक्सपेरीया मॉलमधील के. एफ. सी. हॉटेलमध्ये (शॉप) सेवक म्हणून काम करतात. ते कौसा मुंब्रा भागात राहतात. संभाजी राठोड असे मानपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारदार हवालदाराचे नाव आहे.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील फडके रस्त्यावरील डीजे, ढोलताशांच्या दणदणाटाने रहिवासी हैराण

पोलीस तक्रारीमधील माहिती अशी की, बदलापूर भागात राहणारे पिंकेश राऊळ पत्नीसह एक्सपेरीया माॅलमधील के. एफ. सी. हॉटेलमध्ये (शॉप) रविवारी भोजनासाठी आले होते. हॉटेलमध्ये आल्यावर त्यांनी सेवकाकडे पाणी पिण्यास मागितले. त्यावेळी त्या सेवकाचे हात खराब होते. पाण्याचे पेले भरत असतानाच सेवकाने हात पाण्याने धुतले. पाण्याचे पेले राऊळ पती, पत्नीसमोर आणून ठेवले. हे अशुध्द पाणी आम्हास पिण्यास का दिले, असा प्रश्न राऊळ दाम्पत्याने सेवक अली हुसेन यांना केला. त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. म्हणून राऊळ यांनी रात्रपाळी व्यवस्थापक सिध्देश साबळे यांना ही माहिती. त्यांनी त्याची दखल घेतली नाही.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील फडके रस्त्यावरील पदपथावर भजी विक्रेत्याकडून सिलिंडरचा वापर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हॉटेलमध्ये घडलेला प्रकार मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कादबाने यांच्या व्हॉट्सपग्रुपवर आला. त्यांनी तातडीने गस्ती पथकातील संभाजी राठोड, महेश गायकर या हवालदारांना एक्सपेरीया मॉलमधील के. एफ. सी. हॉटेलमध्ये जाण्यास सांगितले. दोन्ही हवालदार हॉटेलमध्ये आल्यावर राऊळ दाम्पत्याने घडलेला प्रकार त्यांना सांगितला. पोलिसांनी सत्यतेसाठी हॉटेलमधील सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्यात सेवक अली हुसेन हात स्वच्छ न धुता राऊळ दाम्पत्याला अशुध्द पाणी पेल्यातून पिण्यास देत असल्याचे दिसत होते. अशुध्द पाण्याने जंतु संसर्ग होऊ शकतो. मानवी आरोग्यास अपाय होऊ शकतो हे माहिती असुनही सेवक अली यांनी हयगयीचे, घातकी कृत्य केल्याने त्यांच्या विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.