‘कल्याण-डोंबिवली शहरात यापुढे एकाही बांधकाम प्रकल्पाला परवानगी देऊ नये,’ असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आणि बांधकाम व्यावसायिकांसह राजकीय नेत्यांच्या पोटातही गोळा निर्माण झाला. महापालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असतानाच न्यायालयाच्या या आदेशामुळे बांधकाम व्यावसायिकांवर अचानक संक्रांत ओढाविली. त्याचा विपरीत परिणाम निवडणुकीच्या रसदेवर होण्याची भीती राजकीय नेत्यांना वाटू लागली नि कल्याण शहरात ‘राजकीय’ अस्वस्थताच निर्माण झाली.
कल्याण ते बदलापूर परिसरातील काही हजार भूखंडांवर नजीकच्या काळात मोठय़ा बिल्डरांचे गृहप्रकल्प उभे राहणार आहेत. मात्र न्यायालयाच्या आदेशाने या गृहप्रकल्पांना फटका बसणार आहे. महापालिका हद्दीत सुमारे ५० बांधकाम प्रकल्पांना न्यायालीयन आदेशाचा थेट फटका बसणार आहे. २७ गावांचा महापालिका हद्दीत निवडणुकीपूर्वी समावेश झाल्यास तेथील मोकळ्या जमिनींवर डोळा ठेवून असणाऱ्या मोठय़ा बिल्डरांनाही या निर्णयाचा फटका बसू शकेल. हे लक्षात घेऊन न्यायालयाच्या आदेशामुळे आलेले गंडांतर दूर करण्यासाठी येथील राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला असून निवडणुकीच्या हंगामात बिल्डरांची वक्रदृष्टी नको, यासाठी या मुद्दय़ावर तोडगा काढण्यासाठी आगामी काळात कल्याणात सर्वपक्षीय युती होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
बिल्डरांवर आलेल्या ‘अवकाळी’ संकटामुळे शहरातील काही लोकप्रतिनिधी कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे कल्याण-डोंबिवली शहराच्या कारभाराचे िधडवडे निघाल्याने निवडणुकीत हा मुद्दा येथील सत्ताधाऱ्यांसाठी अडचणीचा ठरण्याची चिन्हे आहेत. बडय़ा बिल्डरांकडून उभ्या राहणाऱ्या ‘रसदे’वर सत्तेचे इमले रचणाऱ्या राजकीय नेत्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यातही अस्वस्थता पसरली आहे.

सर्वसाधारण सभा
न्यायालयाच्या आदेशाचा फटका राजकीय नेत्यांना बसू नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतला आहे. या मुद्दय़ावर चर्चा करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्याची मागणी त्यांनी केल्याने येथील राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या तर्कवितर्काना जोर आला आहे. यासाठी पक्षाच्या चार नगरसेवकांनी महापौर कल्याणी पाटील यांच्याकडे स्वाक्षरीचे पत्र दिले असून सत्ताधारी शिवसेना या मागणीवर कोणती भूमिका घेते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

२७ गावेही अडचणीत
डोंबिवलीलगत असलेल्या २७ गावांचा महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय पक्का झाल्याने या भागातील शेकडो एकर क्षेत्रफळाच्या भूखंडांवर येत्या काळात गृहप्रकल्प उभे राहणार आहेत. मुंबईतील एका बडय़ा बिल्डरने काही स्थानिक राजकीय नेत्यांच्या पुढाकाराने या गावांमधील जमिनीचे करारनामे करून ठेवल्याची चर्चा आहे. उच्च न्यायालयाचे आदेश या गावांनाही लागू होण्याच्या शक्यतेमुळे या बडय़ा बिल्डरच्या रसदेवर राजकीय इमले उभे करणाऱ्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याची सध्या चर्चा आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणुकीतील अर्थपूर्ण मदतीची परतफेड पुढील काळात करण्याचा शब्दाला फारशी किंमत राहणार नाही. त्यामुळे चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीपूर्वी येथील गृहप्रकल्प न्यायालयीन आदेशाच्या कचाटय़ातून कसे सोडविता येतील, यादृष्टीने येथील राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आल्याचे समजते.
जयेश सामंत, भगवान मंडलिक, कल्याण</strong>