कल्याण – वाहतूक कोंडीने चर्चेत असलेल्या कल्याण शीळ रस्त्यावरील पिंपळेश्वर हाॅटेल भागातील एका खड्ड्यात कल्याणमधील एका नोकरदाराची दुचाकी जोरात आपटली. तरूण दुचाकीवरून रस्त्यावर पडताच पाठीमागून भरधाव वेगात असलेला ट्रक या तरूणाच्या हातावरून गेला. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या या तरूणावर नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. एकविस दिवस मृत्युशी झुंज देत असलेल्या या तरूणाचा शुक्रवारी मृत्यू झाला.
या नोकरदार तरूणाच्या मृत्युने कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. रोहन राजेंद्र शिंगरे (२८) असे मरण पावलेल्या तरूणाचे नाव आहे. तो कल्याण पश्चिमेतील रामबाग भागात आपल्या कुटुंबीयांसह राहत होता. रोहन ज्येष्ठ शिवसैनिक राजेंद्र शिंगरे यांचा एकुलता एक मुलगा होता.
कल्याण डोंबिवली पालिकेच्या माजी महापौर वैजयंती गुजर-घोलप यांनी माध्यमांना दिलेली माहिती, अशी की रोहन शिंगरे हा नवी मुंबईतील वाशी येथे नोकरीला होता. दररोज तो आपल्या कामाच्या ठिकाणी कल्याण शीळ रस्त्याने दुचाकीवरून जात होता. गेल्या महिन्यात २३ जुलै रोजी रोहन आपल्या दुचाकीवरून सकाळच्या वेळेत वाशी येथे कामावर निघाला होता. त्याची दुचाकी शीळ रस्त्याच्या डोंबिवली एमआयडीसीजवळील गॅलेक्सी हाॅटेल ते पिंपळेश्वर हाॅटेल भागात आली.त्यावेळी रस्त्यावर पाण्याने भरलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने रोहनची दुचाकी वेगाने खड्ड्यात आपटून तो रस्त्यावर दुचाकीसह पडला. पाठीमागून भरधाव वेगात येत असलेला ट्रक रोहनच्या डाव्या हातावरून गेला. त्याचा हात ट्रकच्या चाकाजवळील हुकाला अडकल्याने तो ट्रकसोबत काही अंतरावर फरफटत गेला. इतर प्रवासी, पादचाऱ्यांनी ओरडा केल्यानंतर ट्रक चालक पुढे जाऊन थांबला.
एक हात निकामी झालेल्या रोहनला स्थानिकांनी तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल केले. रोहनच्या कुटुंबीयांना रुग्णालयात बोलविण्यात आले. रोहनची प्रकृती गंभीर असल्याने त्याला डाॅक्टरांच्या सूचनेवरून नवी मुंबईतील सानपाडा येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रोहनच्या डावा हात ट्रकखाली आल्याने तो निकामी झाला होता. डाॅक्टरांनी त्याचा डाव हात काढला. त्याच्यावर आवश्यक उपचार केले. त्यामुळे त्याची प्रकृती सुधारत होती. मागील काही दिवसांपासून रोहनची प्रकृती ढासळू लागली. त्याच्या शरीरातील प्रत्येक इंद्रिय काम करेनासे झाले. शुक्रवारी त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.कल्याण शीळ रस्त्यावरील काही भागातील खड्डे आणि कोंडी जीवघेणी ठरू लागल्याने यावर प्रभावी उपाययोजना करा म्हणून माजी आमदार राजू पाटील शासनाकडे सतत पाठपुरावा करत आहेत. या रस्त्याच्या नियंत्रक एमएमआरडीएसह एमएसआरडीसी या तक्रारींची दखल घेत नाही. पलावा चौकातील निळजे काटई पुलावर खड्डे पडले आहेत. या रस्त्याचा समतलपणा खड्ड्यांमुळे गायब झाला आहे. याविषयी प्रवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
शीळ रस्त्यावरील बहुतांशी कामे एका सत्ताधारी राजकीय पक्षाशी वजनदार नेत्याशी संबंधित असल्याची चर्चा आहे. राजू पाटील आणि संबंधित वजनदार नेता यांच्यातील वाद प्रवाशांच्या मुळावर येत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.