अवाजवी बिलांचे सत्र सुरूच, ९ महिने उलटूनही नवीन वीज मीटरची प्रतीक्षा

वसई-विरार शहरातील वीज ग्राहक महावितरणच्या भरमसाट वीजबिलामुळे त्रस्त आहेत. या भरमसाट वीजबिलांमागे सदोष मीटर कारणीभूत असून असे तब्बल दोन लाख सदोष मीटर वसई-विरार परिसरात आहेत. महावितरणने हे मीटर बदलून देण्याचे आश्वासन देऊन ९ महिने उलटले तरीही ते अद्याप बदलण्यात आलेले नाहीत.

वसई-विरार शहरातील वीज ग्राहक वाढीव वीजबिलांनी हवालदिल झाला आहे. २०१३-१४ या वर्षांत शहरातील ग्राहकांचे जुने वीज मीटर बदलण्यात आले. फ्लॅश कंपनीचे तब्बल ४ लाख वीज मीटर बसविण्यात आले होते. विशेष म्हणजे कुठलीही मागणी नसताना हे नवीन मीटर बसविण्यात आले होते.

ही सर्व मीटर सदोष असून त्यामुळे वाढीव वीजबिले येऊ  लागली असा आरोप नगरसेवक लॉरेल डायस यांनी केला आहे. सदोष वीज मीटरमुळे अवाजवी बिले येत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर दुसऱ्या कंपनीचे मीटर बसवण्यात आले. परंतु त्यानंतरही भरमसाट वीजबिलांमध्ये काहीही फरक पडलेला नाही. हे वीज मीटर उत्पादित करणारी कंपनी एकच असून फक्त वेगळ्या नावाने ते वीज मीटर बाजारात आणले जातात असा आरोप केला जात आहे. सध्या वसई विभागात ५० हजार तसेच नालासोपारा विभागात दीड लाख सदोष मीटर असून ते अद्याप बदलण्यात आलेले नाहीत. अवाजवी वीजबिलांचा मुद्दा पेटल्यानंतर २६ जुलै २०१६ रोजी अधीक्षक अभियंत्यांकडे झालेल्या बैठकीनंतर सर्व सदोष वीज मीटर बदलली जातील असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र ९ महिने उलटून गेले तरी हे मीटर बदलण्यात आलेले नाहीत.

तक्रारी आता कनिष्ठ अभियंत्याकडे

अवाजवी वीजबिलासंदर्भात वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी महावितरणाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती. अवाजवी बिले दुरुस्त करून घेण्यासाठी नागरिकांना उपविभागीय कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात. भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी येथील ग्राहकाला वीजबिलात दुरुस्ती करायची असेल तर त्याला वसईला यावे लागते. यासाठी आता वीजबील दुरुस्तीचे काम कनिष्ठ अभियंत्यांकडे देण्यात आले आहेत. ग्राहकांनी आपापल्या विभागातील कनिष्ठ अभियंत्यांना ही चुकीचे वीजबिले द्यायची आणि त्या कनिष्ठ अभियंत्यांनी ती दुरुस्त करून द्यावीत असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. याशिवाय आमदार ठाकूर यांनी सर्व ९ प्रभागातील नगरसेवकांना ग्राहकांच्या वीजबिलांच्या तक्रारी जाणून घेण्याचे आदेश दिले. त्यानुसर गुरुवारपासून प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या वीजबिलांच्या तक्रारी जाणून घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर २ आणि ३ मे रोजी त्याचा आढावा घेतला जाणार आहे.

कनिष्ठ अभियंते, कर्मचाऱ्यांचा तुटवडा

नालासोपारा विभागात सव्वा पाच लाख तर वसई विभागात सुमारे अडीच लाख वीज ग्राहक आहेत. प्रत्येक कनिष्ठ अभियंत्याकडे ८ हजार ग्राहक झाले की नवीन कनिष्ठ अभियंता द्यावा लागतो. नालासोपारा विभागात ६० कनिष्ठ अभियंत्यांची गरज असताना केवळ २७ कनिष्ठ अभियंते आहेत तर वसई सध्या २५ कनिष्ठ अभियंते असून अजून दहा कनिष्ठ अभियंत्यांची गरज आहे.

आरोप फेटाळले

सदोष मीटर आहेत हे खरे असले तरी त्यांची संख्या एवढी जास्त नाही. आमच्याकडे दर आठवडय़ाला नवीन मीटर येत असतात. ते आम्ही समप्रमाणात वसई आणि नालासोपारा विभागामध्ये वितरित करून बदलून देत आहोत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अरुण पापडकर, अधीक्षक अभियंता, महावितरण