शहरी संस्कृतीत संवादाची कट्टे आणि मंडळे ही प्रभावी माध्यमे. ठाण्यातील तलावपाळी हे अशांपैकीच एक माध्यम. ‘मॉर्निग वॉक’पासून ते रात्रीच्या शतपावलीपर्यंत येथे निरनिराळे समूह नित्यनेमाने भेटत असतात. प्रभात फेरी मंडळ अशांपैकीच एक. तलावाला दोन किंवा तीन प्रभात फेऱ्या मारणाऱ्या या मंडळींमध्ये आता मैत्रीचे घट्ट बंध निर्माण झाले आहेत. एक-दोन नव्हे तर सलग २५ वर्षे अखंडपणे भल्या पहाटेची ही संवाद मैफल अखंडपणे सुरू आहे. गेल्याच आठवडय़ात या मंडळाने आपला रौप्य महोत्सव साजरा केला.
१७ एप्रिल १९९१ रोजी तलावपाळीच्या या प्रभात फेरी मंडळाची स्थापना त्यावेळी नियमितपणे येणाऱ्या पंडित, दातीर, मनोहर आचार्य आदींनी केली. त्यापैकी दातीर दोन-तीन वर्षांपूर्वी वारले. नव्वदी गाठलेले पंडित आता घराच्या बाहेर पडत नाहीत. ८४ वयाचे मनोहर आचार्य मात्र दररोज नौपाडय़ातील साठेवाडीतून रिक्षाने तलावपाळीवर सकाळी हजेरी लावतात. त्यासाठी रोज २०-२५ रुपये खर्च करतात. सकाळी चालले की शरीराला व्यायाम मिळतो आणि समवयस्कांशी बोलले की मनालाही बरे वाटते. दिवसाची सुरुवात चांगली होते. त्यामुळे शक्यतो कुणीही सकाळची फेरी चुकवत नाही, अशी माहिती प्रभात फेरी मंडळाचे एक सदस्य लेखक सुरेश देशपांडे यांनी दिली. गेल्या पाव शतकाच्या काळात मंडळातील काही सदस्य निवर्तले. काही अन्य ठिकाणी राहायला गेल्यामुळे येईनासे झाले. काही नव्याने जोडले गेले. सध्या रौप्य महोत्सवी वर्षांत या प्रभात फेरी मंडळाचे २२ क्रियाशील सदस्य असून ते नियमितपणे येत असतात.
सकाळी तलावाला फेऱ्या मारणे आणि त्यानंतर काही क्षण कट्टय़ावर काव्य, शास्त्र, विनोद आणि राजकारणावर गप्पा मारणे हाच या मंडळाचा मुख्य कार्यक्रम. दरम्यानच्या काळात आरोग्यविषयक जागरूकता वाढीस लागल्याने आता मॉर्निग वॉकला येणाऱ्यांची संख्या खूपच वाढली आहे. कारण चालणे हा सगळ्यात सोपा व्यायाम आहे. तरी प्रभात फेरी मंडळ या भाऊगर्दीतही उठून दिसते. गडकरी रंगायतच्या मागच्या बाजूला असणाऱ्या नाना-नानी पार्कमध्ये मंडळाने अगदी थाटात आपला रौप्य महोत्सव साजरा केला. सनईच्या मंगलमय सुरांनी उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. ठाण्याचे माजी महौपार प्रेमसिंग रजपूत यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘होम मिनिस्टर’च्या धर्तीवर एकमेकांच्या टपल्या उडविणारा बहारदार कार्यक्रम सादर झाला. अनिल रेवणकर, आठवले, माधव धामणकर, बापूराव बेडसूर आदींनी त्यात पुढाकार घेतला. करंडे दाम्पत्याने सर्वाना अल्पोपहार दिला. अशा रीतीने रौप्य महोत्सवी टप्प्यावर एकमेकांमधील मैत्रीचे बंध अधिक दृढ करून प्रभात फेरी मंडळाचे हे स्नेहसंमेलन पार पडले.  
प्रशांत मोरे, ठाणे