मुलींसाठी टॉप तर मुलांना टी-शर्टचा पर्याय

किन्नरी जाधव, ठाणे</strong>

थंडीचे आगमन होताच छोटय़ा-मोठय़ा दुकानांत स्वेटर, जॅकेट किंवा मफलर झळकू लागतात. मात्र मुंबई, ठाण्यासारख्या शहरांत सतत स्वेटर घालून फिरणे शक्य नसते. अशा वेळी थंडीपासून बचाव करणारे आणि तरीही वेशभूषा आकर्षक बनवणारे कपडे बाजारात ग्राहकांना आकर्षित करू लागले आहेत. लोकरीची वापर करून बनवलेले टी-शर्ट आणि टॉप तरुणाईला आकर्षित करू लागले असून ईकॉमर्स संकेतस्थळांवरही अशा कपडय़ांची विक्री वाढली आहे.

हिवाळा सुरू झाल्यावर थंडीपासून रक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्वेटर्स बाजारात उपलब्ध होतात. मात्र एखाद्या थंडीच्या ठिकाणी चांगला ड्रेस परिधान केल्यावर त्यावर स्वेटर परिधान करून फॅशन जपली जात नसल्याने ग्राहकांचा हिरमोड होत होता. यासाठी हिवाळ्यात थंडीपासून बचाव व्हावा आणि फॅशनही जपली जावी या हेतूने तयार करण्यात आलेल्या स्वेटर ड्रेसला ग्राहकांची पसंती मिळत आहे. मुलींची फॅशन ट्रेंड जपणारे टॉप्स, फ्रॉक बाजारात उपलब्ध असून या कपडय़ांच्या खरेदीसाठी ग्राहकांमध्ये उत्सुकता आहे. स्वेटरसारखे जाड कपडय़ातील टॉप्स ५०० रुपयांपासून बाजारात उपलब्ध आहेत. तसेच विविध रंगांतील आकर्षक स्वेटरचे फ्रॉक हजार रुपयांपासून विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या दोन्ही प्रकारच्या कपडय़ांची रचना हिवाळ्यातील थंडीच्या हेतूने करण्यात आली असून या टॉप्स किंवा गुडघ्यापर्यंत असणाऱ्या फ्रॉकवर जाड कपडय़ांची विजार घातली तरी थंडीच्या दिवसातही फॅशन जपता येणे शक्य होणार आहे. यामध्ये पायापर्यंत असलेले फ्रॉकही उपलब्ध असून या फ्रॉकला जास्त मागणी असल्याचे विशाल दुकानाचे अरुण बोरिचा यांनी सांगितले.

मुलांमध्ये फ्लॅट नेटचा ट्रेंड

थंडी आल्यावर हुडीज वापरण्याकडे ग्राहकांचा कल असला तरी सध्या फ्लॅट नेट टी-शर्ट परिधान करण्याकडे तरुण जास्त पसंती देत आहेत. नियमित वापरासाठी हुडीज वापरणे सोयीस्कर नसल्याने फॅशन ट्रेंड जपणाऱ्या फ्लॅट नेट टी-शर्टला मागणी जास्त असल्याचे ठाण्यातील दुकानदारांकडून सांगण्यात येत आहे. या टी-शर्टसाठी लोकरीचा वापर करण्यात आला नसला तरी जाड धाग्याने हे टी-शर्ट तयार करण्यात आले आहेत. या टी-शर्टमध्ये संपूर्ण हात झाकले जात असून स्वेटरसारखेच भासणारे फ्लॅट नेट टी-शर्ट हजार ते दोन हजार रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत, असे लुक फॅशन दुकानाचे सचिन सिंधवी यांनी सांगितले.