डोंबिवली – गेल्या काही महिन्यांपासून एमआयडीसीकडून २७ गाव, डोंबिवली एमआयडीसी विभागाला कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. याविषयी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. संतप्त नागरिकांनी गेल्या आठवड्यात एमआयडीसीवर मोर्चा काढला होता. या पाणी समस्येची गंभीर दखल घेऊन कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी एमआयडीसीच्या अभियंत्यांसह बारवी येथून पाणी पुरवठा होणाऱ्या जांभूळ येथील जलशुध्दीकरण केंद्राची गुरूवारी पाहणी केली. आणि अधिकाऱ्यांना २७ गाव, एमआयडीसी परिसराला दररोज मुबलक पाणी पुरवठा होईल यादृष्टीने नियोजन आणि सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले.
पुरेसा पाऊस पडूनही मागील काही महिन्यांपासून डोंबिवली जवळील २७ गाव, डोंबिवली एमआयडीसी निवासी, औद्योगिक क्षेत्र परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. नियमित सकाळी येणारे पाणी अनेक वेळा येत नसल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत. यापूर्वी एमआयडीसीत चोवीस तास मुबलक दाबाने पाणी पुरवठा होत होता. त्यामुळे रहिवाशांनी एमआयडीसीत घर घेण्याला प्राधान्य दिले. आता पाणी येत नसल्याने रहिवाशांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
२७ गाव, एमआयडीसी भागातील उद्योग, व्यवसाय, शाळा, महाविद्यालय, खासगी कार्यालयाने यांनाही या पाणी टंचाईची झळ बसत आहे. या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन आमदार राजेश मोरे यांनी गुरुवारी एमआयडीसीचे पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता अमोल मुसरकर यांच्यासह अंबरनाथ तालुक्यातील जांभूळ येथील एमआयडीसीच्या जलशुध्दीकरण केंद्राचा दौरा केला.
यावेळी त्यांच्या सोबत डोंंबिवली विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष चव्हाण, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश म्हात्रे, माजी नगरसेवक जालिंदर पाटील उपस्थित होते. यावेळी आमदार मोरे यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडून उदंचन केंद्र, पाणी पुरवठा पंप आणि त्यांची क्षमता, पाणी पुरवठा वितरण केंद्र, गाळणी केंद्र, एमआयडीसीच्या वाहिका आणि त्यांची क्षमता याविषयीची माहिती घेतली.
बारवी धरणातून दररोज मुबलक पाणी उपसा होऊन तो शहरांना केला जात असताना, मग २७ गाव, एमआयडीसी परिसराला कमी दाबाने पाणी पुरवठा का होतो याविषयीची माहिती आमदार मोरे यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली. अधिकाऱ्यांनी २७ गाव, एमआयडीसी परिसराला नियमित किती आणि कसा पाणी पुरवठा केला जातो याची तांत्रिक माहिती जलशुध्दीकरण केंद्रावर दाखवली. या दोन्ही भागांना नियमित पाणी पुरवठा होतो तर मग हा पाणी पुरवठा कमी दाबाने का होतो असे प्रश्न आमदार मोरे यांनी उपस्थित केले.
यावेळी पाणी पुरवठा सुरळीत आहे तर मग २७ गाव, डोंबिवली एमआयडीसी भागाला मुबलक पुरेशा दाबाने दररोज पाणी पुरवठा होईल यादृष्टीने प्रयत्न करा आणि या पाणी पुरवठ्याचा सविस्तर आराखडा तयार करा, असे निर्देश आमदार मोरे यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांना दिले. यापुढे पाणी टंचाईची एकही तक्रार येता कामा नये, असेही आमदारांनी अधिकाऱ्यांना सांगितले. या दौऱ्याच्यावेळी माजी नगरसेवक विष्णु गायकवाड, मुकेश पाटील, लालचंद भोईर, सुनील भोईर, रमाकांत पाटील, दत्ता वझे, गणेश भाने, विजय भाने उपस्थित होते.
