कुटुंबीयांनी दिलेलं घरचं जेवण दिलं नाही म्हणून कैद्याने पोलिसांवरच हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ठाण्यातील नौपाडा येथे हा प्रकार घडला. पोलीस बंदोबस्तात कैद्याला व्हॅनमधून ठाणे कारागृहात नेलं जात होतं. यावेळी पोलिसांनी त्याला कुटुंबीयांनी दिलेलं घरच जेवण घेऊन दिलं नाही. याचा राग धरत त्याने पोलिसांवरच हल्ला केला.
मोहम्मद सोहेल शौकत अली असं या आरोपीचं नाव आहे. त्याच्यासोबत इतर कैद्यांनाही दिंडोशी न्यायालयात हजर केल्यानंतर पोलीस व्हॅनमधून परत ठाणे कारागृहात नेलं जात होतं. न्यायालयाबाहेर त्याच्या एका नातेवाईकाने त्याला घरचं जेवणं देण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याला रोखलं. यामुळे चिडलेल्या अलीने व्हॅनमध्ये बसल्यानंतर पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तसंच आक्षेपार्ह भाषा वापरत शिवीगाळही करु लागला. पोलीस त्याला शांत राहण्यास सांगत होते. पण तरीही त्याचा अरेरावीपणा सुरु होता. यावेळी तो एका पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर थुंकला आणि धक्काबुक्की कऱण्यास सुरुवात केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, अलीने स्वत:लाही जखमी करुन घेतलं असून त्याला रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं होतं. यानंतर पुन्हा त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.