दोनपेक्षा जास्त वेळा दंड आकारलेल्यांची यादी आरटीओकडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे पूर्व रेल्वे स्थानक ते कासारवडवली या मार्गावर बेकायदा धावणाऱ्या खासगी बसगाडय़ांचे परवाने रद्द करण्याचे कोणतेही अधिकार नसल्यामुळे वाहतूक पोलीस केवळ दंडात्मक कारवाई करीत आहेत. मात्र, या कारवाईनंतरही खासगी बसगाडय़ांचा गोरखधंदा शहरात सुरू असल्याचे वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी आता दोनपेक्षा अधिक वेळा दंडात्मक कारवाई करण्यात आलेल्या बसगाडय़ांच्या क्रमांकाची यादी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाला पाठवून त्यांचे परवाने रद्द करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे या बसगाडय़ांच्या मालकांवर संक्रात ओढावण्याची चिन्हे आहेत.

ठाणे शहर आणि घोडबंदर या भागातील महामार्गावर गेल्या काही वर्षांपासून खासगी बसगाडय़ांमधून प्रवाशांची बेकायदा वाहतूक सुरू आहे. या बसगाडय़ा ठाणे पूर्व स्थानक ते कासारवडवली या मार्गावर चालविण्यात येतात. या बस वाहतुकीमुळे ठाणे पूर्व (कोपरी) भागात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली होती. त्यामुळे कोपरीतील रहिवाशांनी आंदोलन उभारत खासगी बसगाडय़ांना कोपरीत प्रवेश बंद करण्याची मागणी केली होती. त्यानंतर ठाणे वाहतूक पोलिसांनी खासगी बसगाडय़ांना कोपरीत प्रवेश बंद केला होता.

या प्रवेश बंदीनंतर खासगी बस वाहतूक ठाणे पश्चिमेतील नौपाडा तसेच जांभळी नाका भागातून सुरू झाली होती. या मुद्दय़ावरून वाहतूक पोलीस आणि ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या कारभारावर टीका होऊ लागली होती. या टीकेनंतर वाहतूक पोलिसांनी खासगी बसगाडय़ांविरोधात सातत्याने कारवाई सुरू केली आहे. परंतु या बसगाडय़ांचे परवाने रद्द करण्याचे अधिकार नसल्यामुळे वाहतूक पोलीस केवळ दंडात्मक कारवाई करत आहेत. खासगी बसचालकांकडून १२०० रुपयांचा दंड वसूल करण्यात येतो. केवळ दंडात्मक कारवाई होत असल्यामुळे खासगी बसमालकांचे फावले असून त्यांचा शहरामध्ये गोरखधंदा सुरूच आहे.

या संदर्भात ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी शहरात बेकायदा प्रवासी वाहतूक करत असलेल्या खासगी बसगाडय़ांविरोधात सातत्याने दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. तसेच ही बस वाहतूक बंद व्हावी यासाठी दोनपेक्षा अधिक वेळा दंडात्मक कारवाई केलेल्या बसगाडय़ांचे परवाने रद्द करण्याची शिफारस ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात ठाणे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी बसगाडय़ांचे परवाने रद्द करण्यासंबंधीचे कोणतेही पत्र वाहतूक पोलिसांकडून प्राप्त झालेले नसल्याचा दावा केला. तसेच वाहतूक पोलिसांनी दिलेल्या पत्रानुसार यापूर्वी वेळोवेळी कारवाई करण्यात आली आहे. हे पत्र प्राप्त झाल्यानंतरही कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. आमच्या पथकामार्फतही सातत्याने कारवाई करण्यात येते. ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उड्डाणपुलावरून धोकादायक प्रवास..

ठाणे आणि घोडबंदर भागातील महामार्गावर असलेल्या उड्डाणपुलांवरून खासगी बसगाडय़ा प्रवासी वाहतूक करतात. उड्डाणपुलांच्या पायथ्याशी बसगाडय़ा थांबवून प्रवाशांची वाहतूक करण्यात येत आहे. मात्र, या वाहतुकीमुळे मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Private bus permits in trouble illegal private bus
First published on: 08-12-2017 at 03:57 IST