शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाणे जिल्ह्यात आता राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. कळवा तसेच ठाणे परिसरात शिंदे समर्थकांनी ‘आम्ही सहेबांसोबत’ असे बॅनर लावण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे या बॅनर्सवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे फोटो गायब आहेत. बॅनरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचे फोटो मात्र लावण्यात आलेत.
नक्की वाचा >> ‘संजय राऊत प्रत्यक्षात..’, ‘मंत्रीपद नको पण..’, ‘माझे पुतळे का..’, ‘अन्यथा मी..’; कॉलदरम्यान शिंदेंकडून मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार
ठाणे शहरातील महापालिकेतील ९० टक्क्यांपेक्षा अधिक माजी नगरसेवक शिंदे यांच्या सोबत राहतील असे दावे त्यांचे समर्थक करू लागले आहेत. शिंदे यांचे काही निकटवर्तीय गुवाहाटी येथे त्यांच्या समवेत असल्याचे बोलले जाते. त्यात काही माजी नगरसेवकांचा समावेश आहे. दरम्यान मंगळवारी शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे जिल्ह्यात शुकशुकाट पाहायला मिळाला होता.
नक्की वाचा >> एकनाथ शिंदे प्रकरण : “गुजरातच्या भूमीवरून फडफड करणाऱ्यांनी…”; भाजपाला ‘ईस्ट इंडिया कंपनी’ म्हणत शिवसेनेचा हल्लाबोल
टेंभी नाका येथील आनंद आश्रमात एरवी शिवसैनिकांची गर्दी असते. मात्र काल या ठिकाणी फारशी गर्दी नव्हती. बुधवारी मात्र ठाणे, कळवा भागात शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर लागल्याने ही शिवसेना आणि ‘शिंदे सेना’ अशी थेट लढाई आता सुरू होईल असे संकेत मिळू लागले आहेत. नवी मुंबईत जिल्हा शखेमार्फत निदर्शनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. या निदर्शनास शिवसेनेचे कोणते नेते उपस्थिती राहतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.