मयूर ठाकूर

क्विन्स पार्क संकुल, भाईंदर पूर्व

भाईंदर पूर्वेला असलेली क्विन्स पार्क ही सोसायटी शहरातील उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखली जाते. या सोसायटीत सहा इमारती आहेत. मात्र अपुरा पाणीपुरवठा, कचऱ्याची समस्या यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यात वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिक भयभीत आहेत. या सोसायटीच्या आवारात बेकायदा वाहनतळ बनल्याने समस्यांमध्ये भर पडत चालली आहे.

भाईंदर पूर्वेला १९९९मध्ये क्विन्स पार्क या गृहसंकुलाची निर्मिती करण्यात आली. क्विन्स पार्कमध्ये एकूण सहा इमारतींचा समावेश आहे. ओम श्री साई राम, साई पार्क, क्विन्स आर्च, क्विन्स कोर्ट आणि पार्क प्लाझा या इमारती या गृहसंकुलात आहेत. या संपूर्ण परिसरातील इमारतीमध्ये एकूण २४८ कुटुंबीय असून १२०० नागरिक वास्तव्य करत आहेत. या संकुलात राहणाऱ्या रहिवाशांना प्रामुख्याने पाणीकपात, दुर्गंधी, रस्त्यावरील अवैध पार्किंग, भटके श्वान आणि डासांचा त्रास भेडसावत आहेत. अनेक वेळा तक्रार करूनही आजपर्यंत या समस्यांचे निराकरण झालेले नसल्याने रहिवासत्रस्त आहेत.

अपुरा पाणीपुरवठा

क्विन्स पार्क गृहसंकुलात १२०० जण राहात असले तरी वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेनुसार महापालिकेकडून पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत नसल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. पाण्याचा दाब कमी असतो. त्यातच आठवडय़ातून दोन दिवस म्हणजे शुक्रवारी व शनिवारी पाणीकपात केली जाते. आधीच पाण्याची कमतरता असल्याने या कपातीने रहिवाशांना मोठा त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

चोरीच्या प्रमाणात वाढ

क्विन्स पार्क परिसरात गेल्या वर्षभरापासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी या परिसरातील दुकानांत आणि मंदिरातही चोरी झाली होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या भागात पोलीस गस्त घातली जात नाही. पोलीस चौकी बनवण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. मात्र अद्याप ती पूर्ण झालेली नाही.

परिसरात कचऱ्याचे साम्राज्य

महापालिकेने या परिसरातील गृहसंकुलांना कचऱ्याचे डब्बे दिले असले तरी वेळोवेळी पालिकेकडून कचऱ्याचे डब्बे उचलले जात नसल्याने नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. अनेक काळ कचरा पडलेला असल्यामुळे  सोसायटीमध्ये दुर्गंधी पसरत आहे. तसेच नागरिकांना आजार होण्याची शक्यताही वाढत आहे. सोसायटीच्या चारही बाजूला दुर्गंधी पसरलेली असल्यामुळे  सोसायटीमधील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही तोडगा निघाला नाही.

रस्त्यावरील अवैध पार्किंगचा त्रास

क्विन्स पार्क परिसरात लोकसंख्या आणि इमारती अधिक वाढल्या असल्यामुळे नागरिकांना पार्किंगच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध नसल्यामुळे या भागात बेकायदा वाहने उभी केली जात आहेत. त्याचा विळखाच संकुलाला पडला आहे. दोन्ही बाजूने मोठय़ा प्रमाणात उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांमुळे लहान मुलांना खेळण्यासही जागा शिल्लक राहिली नाही.

क्विन्स पार्क परिसरात मोठय़ा प्रमाणात मतदार असून लोकसंख्याही अधिक आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुविधेकडे लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे.

– सुनील साळवी, स्थानिक रहिवासी.