ठाणे : महापालिका क्षेत्रातील १२७ पात्र शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) यंदाच्या शैक्षणिक वर्षाकरिता ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून, २८९२ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया होत आहे. त्यात पहिलीसाठी २६३८, ज्युनिअर केजीसाठी १३४ आणि नर्सरीसाठी १२० जागा आहेत.

वंचित आणि दुर्बल घटकातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हक्क कायद्यात २५ टक्के जागा आरक्षित ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. या जागांसाठी दरवर्षी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. यंदाही ठाणे महापालिकेने शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) यंदाच्या शैक्षणिक वर्षाकरिता ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून https://student.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर १७ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अर्ज नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पालकांनी या पोर्टलवर नर्सरी, ज्युनिअर केजी, तसेच इयत्ता पहिलीसाठी ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी कमीत कमी सहा वर्षे पूर्ण, सिनियर केजीसाठी पाच वर्षे पूर्ण, ज्युनिअर केजीसाठी चार वर्षे पूर्ण, अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

हेही वाचा – डोंबिवलीत आजदे गावामध्ये पाण्याचा फुगा फेकण्यावरून दोन गटांत हाणामारी

हेही वाचा – ठाणे- पाणी पुरवठ्याची तक्रार विनाविलंब दूर करण्यासाठी संवेदनशीलता दाखवा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालकांसाठी मदत केंद्रांची यादी, ऑनलाइन प्रक्रियेत अर्ज नोंदणीबाबत मार्गदर्शक पुस्तिका, आवश्यक कागदपत्र इत्यादीबाबत सर्व माहिती शासनाच्या वरील वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र असणाऱ्या जास्तीत जास्त बालकांच्या अर्जांची नोंदणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे. आरटीई २५ टक्के ऑनलाइन प्रवेशासाठी लागणारी सर्व कागदपत्रे ही ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावी. तसेच, बालकाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे आरटीई प्रवेश पात्र सर्व बालकांसाठी आवश्यक आहेत, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.