ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जनजागृती
ठाणे : ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस करोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह जिल्हा परिषदेने लोककलेतून गावागावांत जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून नुकतेच जिल्हा परिषदेने पोतराज ही ध्वनिचित्रफीत प्रदर्शित केली असून हा पोतराज करोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी कोणते नियम पाळले पाहिजे हे सांगत आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात दिवसाला सरासरी १५० ते २०० रुग्ण आढळून येत आहेत. या भागातील करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आरोग्य विभागासह, ग्रामपंचायत, महिला आणि बाल विकास, शिक्षण आदी विभागांचे कर्मचारी प्रयत्नशील आहेत. गावातील नागरिक लसीकरणासाठी केंद्रावर येत नसल्याने जिल्हा परिषदेने बोली भाषेतून जनजागृती करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर, आता ग्रामीण भागातील रुग्णसंख्या आटोक्यात यावी यासाठी जिल्हा परिषदेमार्फत लोककलेतून तसेच दवंडी, बोलका बाहुला, लघुचित्रफीत, गाणी, मिमन्स, छोटे स्टेटस चित्रफीत, अॅनिमेशन चित्रफीत या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. करोनाकाळात कोणती काळजी घेतली पाहिजे, मुखपट्टीचा वापर करणे, गर्दी करू नये अशी माहिती या माध्यमातून नागरिकांना देण्यात येत आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी
डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या निर्देशानुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही जनजागृती करण्यात येत आहे. विशेष म्हणजे यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे सहकार्य मिळत आहे. या मोहिमेसाठी काही निवडक शिक्षकांचे पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी डॉ. रुपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, शिक्षणाधिकारी संतोष भोसले मार्गदर्शन करत आहेत.
गावागावांत पोतराजची ध्वनिचित्रफीत
चाबूक अंगावर मारत भिक्षुकी करणारा पोतराज, करोना गावात शिरू नये म्हणून गावकऱ्यांनी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत याची माहिती सांगत असलेली ध्वनिचित्रफीत ठाणे जिल्हा परिषदेतर्फे गावागावांत दाखविण्यात आली आहे. ही चित्रफीत समाजमाध्यमांमार्फत गावागावांमध्ये प्रसारित करण्यात आली आहे. या चित्रफितीची निर्मिती मुरबाडमधील गर्जा प्रतिष्ठान या संस्थेने केली असून लेखन योगेंद्र बांगर व दिग्दर्शन नितेश मंगल डोंगरे यांनी केले आहे. मुरबाडमधील कलावंत समीर खुटारे यांनी पोतराजाची भूमिका साकारली आहे. या चित्रफितीचे छायाचित्रण संदीप देशमुख, वेशभूषा भूषण मोरे, रुपेश खाटेघरे, रंगभूषा वैजयंता डोंगरे, निर्मिती साहाय्य सचिन थोरात, संदीप खरे यांनी केले आहे.