विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची टीका
अमीर खान आणि त्याच्या पत्नीने काय बोलावे, हा त्यांचा प्रश्न आहे. तर केंद्र व राज्य सरकारने काय निर्णय घ्यावा, हा त्यांचा प्रश्न आहे; परंतु मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून देशात असहिष्णुता वाढली असून त्याविषयी अनेक साहित्यिक तसेच कलाकारांनी नाराजी व्यक्त केली आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अमीर खानची रस्ते सुरक्षा अभियानातून केंद्र शासनाने गच्छंती केल्याप्रकरणी व्यक्त केली. ठाणे येथील पोलीस परेड मैदानात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कब्बडी सामन्यांना त्यांनी सोमवारी भेट दिली. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
राज्य शासनाने १३ हजार मेट्रिक टन डाळीवर कारवाई केली असून त्यापैकी सुमारे तीन हजार मेट्रिक टन टाळीचा लिलाव केला आहे. त्यामुळे ‘दाल में काला नही, यहा तो पुरी दाल काली है’ असा आरोपही त्यांनी या वेळी केला. केंद्रातील मोदी सरकारविरोधात दोन वर्षांतच असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून त्याचे परिणाम देशातील निवडणुकांमधून दिसून येत आहेत. त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या विरोधातही वर्षभरातच नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. त्यामुळे सत्तेवर असलेल्या शिवसेना-भाजपचे हे अपयश असल्याची टीकाही त्यांनी केली.
धनगर समाजाच्या मेळाव्याच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री येणार होते, तिथेच अश्लील नृत्य दाखवावे, इतकी वाईट वेळ भाजपवर आल्याचीही टीका त्यांनी केली. नागपूर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजेता विजय चौधरी याला पोलीस दलात नोकरी दिली जाणार आहे, त्याचप्रमाणे या स्पर्धेत पराभूत झालेल्या विक्रांत जाधव यालासुद्धा शासकीय सेवेत नोकरी मिळाली पाहिजे. अंतिम स्पर्धेत पोहचण्यासाठी त्याने हालाखीची परिस्थिती अनुभवली असून त्यानंतरच तो तिथपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे त्याला शासकीय सेवेत नोकरी मिळावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले असल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिघावासीयांच्या पाठीशी उभा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.