ठाणे: दहीहंडी स्पर्धेत जय जवान गोविंदा पथकाने ठाण्यात तब्बल तीन वेळा दहा थर रचून हॅट्रिक केली आणि यावरून राजकारणाचे थर उलगडले. मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी फेसबुक पोस्ट करत या पथकाचे अभिनंदन केले, परंतु त्याचबरोबर संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमावर आणि आयोजक पूर्वेश सरनाईक यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. मात्र पूर्वेश सरनाईक यांनी समाजमाध्यम खात्यावर भावनिक पोस्ट करत आपलं आणि जय जवान दहीहंडी पथकाचे नाते कधीही तुटणार नाही असे म्हटले आहे. प्रो गोविंदा स्पर्धेत नियमांमुळे पथकाला बाहेर पडावे लागले होते. तसेच कोकण नगर गोविंदा पथकालासुद्धा नियमांमुळे सहभागी होता आले नव्हते अशीही पुष्टी त्यांनी यात जोडली आहे.
शनिवारी गोपाळकाल्याच्या दिवशी मुंबई आणि विशेषतः ठाण्यात दहीहंडी मनोऱ्यांचा विश्वविक्रम पाहायला मिळाला. मंत्री प्रताप सरनाईक आणि पुर्वेश सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात कोकण नगर गोविंदा पथकाने दहा थर लावत विक्रम केला. त्यानंतर सायंकाळी जय जवान गोविंदा पथकाने दहा थरांचा विक्रम केला. त्यानंतर मनसेच्या अविनाश जाधव यांच्या दहीहंडी उत्सवात जय जवान दहीहंडी पथकाने पुन्हा दहा थर लावत विक्रम केला. मात्र त्यानंतर राजकारणाचे थर पाहायला मिळाले.
मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी आपल्या पोस्ट करत संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमावर टीका केली. पाटील यांनी पोस्टमध्ये असा आरोप केला की, मराठी माणसांच्या मेळाव्यात ठाकरे बंधूंना सलामी दिल्याच्या रागातून जय जवान पथकाला काही स्पर्धांतून जाणीवपूर्वक डावलण्यात आले. तरीसुद्धा, पथकाने एकाच दिवशी तीन वेळा दहा थर लावून आपली ताकद दाखवून दिली. “संस्कार आणि संस्कृती ही वागण्यात असली पाहिजे, नुसत्या नावात काय आहे,” असा उपरोधिक शेरा मारत त्यांनी सरनाईक यांच्यावर निशाणा साधला होता.
या टीकेला आयोजक पूर्वेश सरनाईक यांनीही सोशल मीडियावर उत्तर दिले. त्यांनी एक भावनिक पोस्ट करत काही मुद्दे मांडले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, जय जवान पथकाशी त्यांचे नाते कधीही तुटणार नाही आणि हे पथक त्यांचं अभिमानाचं पथक आहे. त्यांनी अभिनंदन करत लिहिले की, “आज तुम्ही घडवलेला १० थरांचा ऐतिहासिक मानवी मनोरा केवळ यश नाही, तर प्रत्येकाच्या हृदयात अभिमान भरून गेला आहे.”
तसेच, प्रो गोविंदा स्पर्धेतून पथकाला वगळल्याचा आरोपही त्यांनी फेटाळला. निवड प्रक्रिया ही पूर्णपणे नियमबद्ध व मेरिटवर आधारित असल्याचे सांगून त्यांनी उदाहरण दिले की, विक्रमाचा प्रयत्न करणारे कोकण नगर गोविंदा पथक सुद्धा प्रो गोविंदा स्पर्धेत सहभागी नव्हते, कारण त्यांनी वेळेत नोंदणी केली नव्हती. सर्व पथकांसाठी समान नियम होते आणि त्यानुसारच स्थान देण्यात आले, असे त्यांनी स्पष्ट केले.
पूर्वेश सरनाईक यांची पोस्ट
“काही नाती या शंका आणि मतभेदांच्या पलीकडची असतात. कितीही प्रयत्न झाले तरी माझं आणि जय जवान गोविंदा पथकाचं नातं कधीही तुटणार नाही.
आयोजक म्हणून आणि चाहता म्हणूनही — मी होतो, आहे आणि सदैव अभिमानाने म्हणेन, जय जवान हे माझं पथक आहे. आज तुम्ही घडवलेला १० थरांचा ऐतिहासिक मानवी मनोरा केवळ यश नाही, तर प्रत्येकाच्या हृदयात अभिमान भरून गेला आहे. मनःपूर्वक अभिनंदन!
एक गोष्ट स्पष्ट करतो – आम्ही तुम्हाला कधीही Pro Govinda मधून काढले नव्हते. निवड प्रक्रिया ही पूर्णपणे नियमबद्ध व मेरिटवर होती. काल विक्रमाचा प्रयत्न करणारे कोकण नगर गोविंदा पथक सुद्धा Pro Govinda मध्ये सहभागी नव्हते, कारण त्यांनी वेळेत नोंदणी केली नव्हती. नोंदणी ही सर्वांसाठी एकसमान नियम होती आणि त्यावरच स्पर्धेत स्थान दिलं गेलं.”
या पोस्ट नंतर वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न पूर्वेश सरनाईक यांनी केला असल्याचे म्हटले जाते. या राजकीय आरोप प्रत्यारोपात विश्वविक्रमी गोविंदा पथकांची कामगिरी झाकोळली जाऊ नये, अशी भावना गोविंदा प्रेमी व्यक्त करत आहेत.