बदलापूर पालिका हद्दीत एमएमआरडीएने बांधलेल्या कात्रप-शिरगाव रस्त्याच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह
कुळगाव-बदलापूर नगरपालिका हद्दीतून जाणारा कात्रप ते शिरगांव या बाह्य़ वळण रस्त्याची दुरवस्था झाल्याने या कामाच्या दर्जाविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या रस्त्याचे काम मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. या रस्त्यावरून अद्यापही पुरेशा प्रमाणात वाहतूक सुरू झालेली नाही. असे असताना या रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने आश्चय व्यक्त होत आहे. या रस्त्यावरून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू झाल्यास काय अवस्था होईल, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीत येणारा शिळफाटा ते कर्जत हा रस्ता बदलापूर नगरपालिकेच्या हद्दीतून जातो. मूळ शहरातून मोठय़ा प्रमाणावर वाहनांची ये-जा चालू असते. त्यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने शहराला बाह्य़ वळण घेणाऱ्या रस्त्याची निर्मिती केली. शहरातून अवजड वाहने व लांब पल्ल्याची वाहने जाऊ नयेत यासाठी हा रस्ता तयार करण्यात आला आहे. येथील जुना पेट्रोल पंप ते शिरगाव या भागातून हा रस्ता जातो. हा रस्ता पुढे खरवई येथे जोडला जाणार असून तो पुढे कर्जत दिशेला जाणार आहे. मात्र सध्या एका जमिनीच्या वादाचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने हा रस्ता शिरगावापर्यंतच तयार झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावर पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू झालेली नाही. तरीही या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. यंदाच्या पावसानंतर ही परिस्थिती झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याची शंका अनेकांनी उपस्थित केली आहे. तसेच, हा रस्ता मोठा व मोकळा असल्याने अनेक नागरिक येथे सकाळी चालण्यासाठी येतात. मात्र, अल्पावधीतच हा रस्ता खड्डेमय झाल्याने या नागरिकांनी संतापाच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
काही दिवसांतच पूर्ण क्षमतेने हा सुरू करावयाचा झाल्यास त्यात या खड्डय़ांचा मोठा अडसर निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एमएमआरडीए हा रस्ता दुरुस्त करणार का याकडे सर्वाचे लक्ष लागले असून गेल्याच आठवडय़ात अंबरनाथ हद्दीतील एमएमआरडीएच्या रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ांमुळे एका महिलेचा अपघातात मृत्यू झाला होता. या मृत्यूप्रकरणी त्या महिलेच्या मुलीवरच पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. त्यामुळे उडालेल्या गहजबानंतर पोलिसांनी त्याप्रकरणी एमएमआरडीएचे अधिकारी व ठेकेदार यांची चौकशी करण्याचे संकेत दिले होते. त्यानंतरच, लगेचच बदलापुरात एमएमआरडीएनेच बनवलेला व सध्या विशेष वापरात नसलेल्या बाह्य़ वळण रस्त्यावर खड्डे पडल्याचे निदर्शनास आल्याने एमएमआरडीएकडून होणाऱ्या रस्त्यांच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Sep 2015 रोजी प्रकाशित
बाह्य़ वळण रस्त्याचीही दुर्दशा
रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने आश्चय व्यक्त होत आहे.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद

First published on: 29-09-2015 at 00:30 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Question mark over quality of katrap shirgaon road