लोकलमधून ढकलल्याने महिला जखमी

जखमी अवस्थेत कोणी रस्त्यावर पडले असेल, मदतीची याचना करीत असले तरी अलीकडे पोलिसांचा ससेमिरा आणि नसते झंझट मागे नको म्हणून, अनेक वाहन चालक, प्रवासी त्या ठिकाणी थांबवून मदत करण्यास पुढे येत नाहीत. अशाही परिस्थितीत डोंबिवलीतील एका कुटुंबाने मागे पुढे न पाहता रेल्वे मार्गाजवळ पडलेल्या एका जखमी महिलेला कुटुंबाचा घटक असल्यासारखी मदत करुन माणुसकी अजून जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे.

घरातील सदस्य असलेल्या लाडक्या चिमुकल्याला झुकझुक गाडी खूप आवडते म्हणून डोंबिवली एमआयडीसीतील अमीत महामूणकर कुटुंब ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ पालिकेने नव्याने बांधलेल्या सिंगापुरी रस्त्यावर आपल्या दुचाकी वाहनाने फिरण्यास आले होते. चिमुकल्याला झुकझुक गाडी जवळून दाखविता येईल हा त्यांचा उद्देश होता. ठाकुर्ली ते कचोरे दरम्यान गुरुवारी संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान अमीत महामुणकर, त्यांची पत्नी व चिमुकला दुचाकीवरुन येरझऱ्या मारीत होते. त्याचवेळी चिमुकल्याला बाजुने जाणारी झुकझुक गाडी दाखवित होते.

अशी फेरी मारताना अमीत यांना कचोरे येथील रेल्वे मार्गाजवळील गावदेवी मंदिराजवळ रस्त्याच्या कडेला एक महिला रक्तबंबाळ झालेली व मदतीची याचना करीत असलेली दिसून आली. सुरुवातीला ही महिला येथे का बसली आहे, हे अमीत यांना समजले नाही. त्यांनी दुचाकी थांबवून त्या स्त्रिची चौकशी केली. त्यावेळी तिने कण्हत, वेदना सहन करीत घडला प्रकार सांगितला. तात्काळ अमीत यांनी एक रिक्षा चालकाला थांबवून त्यात त्या जखमी स्त्रीला बसविले. तिच्या सोबत पत्नी व चिमुकल्याला बसविले. स्वत: दुचाकीवर बसून जखमी स्त्रीला कल्याणमधील पत्रीपुलाजवळील फोर्टिस रुग्णालयात आणले.

सरिता नवले (४४), रेखा नवले (२२) या आई व मुलगी नाशिक येथे गोरखपूर एक्सप्रेसमध्ये चढल्या. त्या ठाणे येथे येत होत्या.

त्या महिलांच्या डब्यात बसल्या होत्या. या डब्यात उत्तर प्रदेशातून प्रवास करीत आलेला दिनेश उदित नारायण यादव याची पत्नी, मुले बसली होती. डबा महिलांसाठी राखीव असला तरी, दिनेश यादव कसारा, इगतपुरीपासून पत्नी, मुलांना भेटायचे निमित्त करुन ुसामान्य डबा सोडून महिलांच्या डब्यात चढण्याचा प्रयत्न करीत होता. त्याला महिला प्रवासी विरोध करीत होत्या. यामध्ये सरिता, रेखा नवले यांचा सहभाग होता.

कल्याण रेल्वे स्थानकात दिनेश पुन्हा महिलांच्या डब्यात चढला. गाडी सुरु झाली. त्यावेळी रेखा, सरिताने त्यास विरोध केला. आई सरिता डब्यातील स्वच्छतागृहात गेली तेव्हा दिनेश तेथे दरवाजाबाहेर जाऊन उभा राहिला. म्हणून रेखाने त्यास हटकले. त्यावेळी दिनेश व रेखा यांच्यात बाचाबाची होऊन त्याचे पर्यावसान भांडणात झाले. कल्याण रेल्वे स्थानक सुटल्यानंतर हा प्रकार सुरु झाला होता.

गाडीने पत्रीपुल ओलांडल्यानंतर दिनेशने संतापाच्याभरात रेखाला गाडीतून बाहेर ढकलून दिले. त्यावेळी गाडीतील सर्व महिलांनी आरडाओरडा केला. या सर्व महिलांनी एकत्रितपणे दिनशेला गाडीत पकडून ठेवले. ठाणे रेल्वे स्थानक आल्यानंतर त्याला रेल्वे सुरक्षा जवानांच्या ताब्यात दिले.