उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने रेल्वेच्या वतीने विशेष गाडय़ांची घोषणा केली जात आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गाडय़ांची संख्या घटण्याची शक्यता असून लांब पल्ल्याच्या सतत रखडणाऱ्या काही गाडय़ांना बंद करण्याची वेळ आली आहे.  
रेल्वेकडून प्रायोगिक तत्त्वावर या गाडय़ा चालवल्या जातात. मात्र त्या दहा ते १२ तास रखडू लागल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो, तर मध्य रेल्वेच्या हद्दीतून दक्षिण मध्य रेल्वेच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या या गाडय़ांना ना-हरकत प्रमाणपत्र देण्यास दक्षिण मध्य रेल्वेने नकार दिल्याने या गाडय़ा बंद ठेवण्याची पाळी मध्य रेल्वेवर आली आहे. यात गोरखपूर एक्स्प्रेस आणि दरभंगा एक्स्प्रेसचा समावेश आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून रेल्वे विभागाला गाडय़ा वेळेत चालवण्याची तंबी मिळाल्याने अनेक रखडणाऱ्या गाडय़ांना रोखण्यात आल्याची माहिती  रेल्वेच्या सूत्रांनी दिली. उन्हाळ्याच्या सुटीत मुंबई, ठाणे आणि कल्याण या शहरांमधून उत्तर आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या गाडय़ांची संख्या मोठी असून दरवर्षी त्यात वाढ होत आहे. मात्र वाढलेल्या गाडय़ांमुळे रेल्वे रुळांवरील वाहतूक कोंडी वाढून अनेक गाडय़ा रखडण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. पंतप्रधान कार्यालयापर्यंत याविषयीच्या तक्रारींमुळे  रेल्वे विभागाला कडक तंबी देण्यात आली आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाडय़ा इतर रेल्वे विभागाकडून वेळेवर चालवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. वारंवार रखडणाऱ्या अनेक गाडय़ांना यामुळे रोखण्यात आले असून यात  दरबंगा एक्स्प्रेस, गोरखपूर एक्स्प्रेस आणि टीचर्स एक्स्प्रेसचा समावेश होता.

यंदाही लांब पल्ल्याच्या ज्यादा गाडय़ा सोडल्या आहेत. राज्याबाहेरील गाडय़ांबरोबरच महाराष्ट्रासाठीही नव्या गाडय़ा आहेत. त्यामुळे कमी गाडय़ांचा प्रश्न उद्भवणार नाही.
– नरेंद्र पाटील, मध्य रेल्वे जनसंपर्क अधिकारी
 
राज्याबाहेर सुटीवर जाणाऱ्या शिक्षकांसाठी ‘टीचर्स एक्स्प्रेस’ सुरू करण्यात येते. मात्र महाराष्ट्रातील नागपूर आणि कोकणात जाणाऱ्या शिक्षकांना गाडी नाही.
    – मधू कोटियन, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ