पालघर-डहाणूसाठी नवीन गाडय़ा देण्यास नकार

विरारच्या पुढील प्रवाशांनी पालघर-डहाणूसाठी अतिरिक्त गाडय़ा सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. मात्र, रेल्वे प्रशासनाने ही मागणी धुडकावत या मार्गावर अतिरिक्त गाडय़ा सुरू करता येणार नसल्याचे सांगितले आहे. या मार्गावरील गाडय़ांची वाहतूक होण्यासाठी रुळांची क्षमता नसल्याने तसेच गाडय़ांची कमतरता असल्याचे कारण रेल्वेने पुढे केले आहे. मात्र, रुळांची क्षमता नसेल तर या मार्गावरून लांब पल्ल्याच्या गाडय़ांची वाहतूक कशी होते, असा सवाल प्रवासी संघटनांनी केला आहे.

विरार ते डहाणूदरम्यान रेल्वेगाडय़ांची संख्या वाढवावी ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांची मागणी आहे. या मागणीबाबत अनेक राजकीय नेते, खासदार, आमदार यांनी आश्वासने दिली. मात्र रेल्वेने प्रवाशांची ही मागणी पूर्ण करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. डहाणू-वैतरणा रेल्वे प्रवासी सेवाभावी संस्थेने रेल्वेकडे विचारणा केली असता रेल्वेने हे लेखी उत्तर दिले आहे. रेल्वेने २०१४-१५ या वर्षांच्या दिलेल्या माहितीनुसार विरार ते डहाणूदरम्यान दररोज ३५ लाख प्रवासी प्रवास करतात.

रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी दिलेल्या लेखी पत्रानुसार सध्या डहाणू विरारदरम्यान ३४ लोकल फेऱ्या म्हणजेच ईमयू (इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) गाडय़ा, ४ मेमू (मेनलाइन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) गाडय़ा, २ डेमयू (डिझेल मल्टिपल युनिट) गाडय़ा, तर १८ शटल आणि पॅसेंजर गाडय़ा धावतात. या मार्गावरील रुळांची क्षमता नसल्याने तसेच गाडय़ांची कमतरता असल्यामुळे या मार्गावर डहाणूपर्यंत नवीन गाडय़ा सुरू करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

चुकीचे वेळापत्रक बदलण्याची मागणी

या मार्गावर अनेक गाडय़ांचे चुकीचे वेळापत्रक असल्याचे त्यांनी सांगितले. सकाळी विरारवरून डहाणूला जाण्यासाठी साडेदहा ते सवा बारापर्यंत ३ गाडय़ा लागोपाठ असतात. त्यांची काही गरज नसल्याचे रेल्वे प्रवासी संघटनांनी म्हटले आहे, तर संध्याकाळी विरारहून पालघर डहाणूला येण्यासाठी ७ वाजून २० मिनिटांची बलसाड गाडी आहे. त्यानंतर थेट पनवेल डहाणू मेमो ८ वाजून ३४ मिनिटांनी आहे. ती नेहमी उशिरा येते. त्यानंतर ९ वाजून १० मिनिटांची ईएमयू लोकल आहे. प्रवासी बलसाड गाडी पकडण्यासाठी धडपड करतात, कारण ती गाडी चुकली की थेट ९ वाजेपर्यंत वाट पाहावी लागते. त्यामुळे या सर्व गाडय़ांचे नव्याने वेळापत्रक तयार करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे.

रेल्वे संघटनांचा विरोध

रेल्वे प्रवासी संघटनांनी याला जोरदार विरोध केला आहे. डहाणू वैतरणा रेल्वे प्रवासी सेवाभावी संस्थेचे सहसचिव प्रथमेश प्रभुतेंडोलकर यांनी या पत्रावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रेल्वे म्हणते, क्षमता नाही. मग नव्याने घोषित करण्यात आलेल्या ‘तेजस’, ‘हमसफर’, ‘अंत्योदय’ या गाडय़ा त्या रुळांवर कशा धावू शकतात, असा सवाल त्यांनी केला. रेल्वे प्रवाशांची धूळफेक करत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.