ठाणे : ठाणे, गुजरात आणि मुंबई भागातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंदर मार्गावरील माजिवाडा उड्डाण पुलावरील मुंबई मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम काही दिवसांपुर्वी हाती घेण्यात आले आहे. मात्र, अवकाळी पावसामुळे दुरुस्ती काम रखडल्याचे चित्र असतानाच, मानपाडा, पातलीपाडा आणि वाघबीळ उड्डाण पुलावरील उंच-सखल रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम अद्याप हाती घेण्यात आलेले नाही. पावसाळा तोंडावर आला तरी ही कामे सुरू झालेली नसल्यामुळे ही कामे होणार कधी असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित होऊ लागला आहे.

उरण येथील जेएनपीटी बंदर ते गुजरात अशी वाहतूक करणारी अवजड वाहने घोडबंदर मार्गाचा वापर करतात. या वाहनांची संख्या मोठी असून या वाहनांना रात्री आणि दुपारच्या वेळेत वाहतूकीस परवानगी आहे. याशिवाय, घोडबंदर भागाचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. येथील नागरिक घोडबंदर मार्गे वाहतूक करतात. यामुळे घोडबंदर मार्गावर वाहनांचा भार वाढून कोंडी होते. या मार्गावर आणि त्यावरील उड्डाणपुलांवर पावसाळ्यात खड्डे पडतात. यामुळे वाहनांचा वेग मंदावून अभुतपुर्व कोंडी होते, हे चित्र दरवर्षी दिसून येते. त्यातच या मार्गावर मेट्रो प्रकल्प, मुख्य आणि सेवा रस्ते जोडणीचे काम सुरू आहे. या कामामुळे घोडबंदर मार्ग काहीसा अरुंद झाला आहे. हा मार्ग एमएमआरडीएच्या अखत्यारीत येतो तर, त्यावरील उड्डाणपुल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतात.

यंदाच्या पावसाळ्यात घोडबंदर मार्गावर आणि त्यावरील उड्डाणपुलांवर खड्डे पडले तर वाहतूक कोंडी होण्याची भिती व्यक्त होत होती. हीच बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिका प्रशासनाने संबंधित प्राधिकरणांना पत्र पाठवून रस्ते दुरुस्त करण्याची सुचना केली होती. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने माजिवडा उड्डाण पुलावरील मुंबई मार्गिकेचे काम हाती घेतले. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे हे काम थांबले आहे. यामुळे दुरुस्तीचे काम अर्धवट अवस्थेत असून येथे रस्त्यावरील डांबर यंत्राद्वारे खरडून काढण्यात आलेले आहे. त्यावरून दुचाकी चालविताना चालकांना तारेवरची कसरत करावी असून येथे अपघातांची भिती व्यक्त होत आहे. तसेच याठिकाणी रस्ते दुरुस्तीचे साहित्य ठेवण्यात आलेले असल्यामुळे कोंडी होत आहे. हे काम २० मे पर्यंत पुर्ण केले जाणार होते. परंतु पावसामुळे हे काम अद्यापही पुर्ण होऊ शकलेले नाही.

उड्डाण पुलांची दुरुस्ती कधी ?

घोडबंदर मार्गावरील मानपाडा, पातलीपाडा आणि वाघबीळ उड्डाण पुलाचे गेल्यावर्षी मास्टीक पद्धतीने नुतनीकरण करण्यात आले. परंतु सततच्या अवजड वाहतूकीमुळे मास्टकचे अनेक ठिकाणी फुगवटे आले असून यामुले अनेक ठिकाणी उंच-सखल रस्ता झाला आहे. पावसाळा तोंडावर आला तरी या पुलांच्या दुरुस्तीचे काम अद्याप हाती घेण्यात आलेले नाही.

ठाणे शहरातील पूर्व द्रुतगती महामार्ग, कापूरबावडी जंक्शन, घोडबंदर रोड, गायमुख घाट परिसरातील कामांची पाहाणी करत रस्ते दुरुस्तीची सर्व कामे १५ मेपर्यंत पूर्ण करून सर्व रस्ते वाहतूक योग्य करण्याचे निर्देश ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, एमएमआरडीए या सर्व यंत्रणांना दिले होते. दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे काम होईल याची प्रत्येक यंत्रणेने दक्षता घ्यावी, असेही निर्देशही त्यांनी दिले आहेत. या कामांची पाहाणी करण्यासाठी त्यांनी ठाणे महापालिकेची सर्व यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, एमएमआरडीए, महावितरण, वाहतूक पोलीस यांच्यासह संयुक्त दौरा केला होता. असे असले तरी, उड्डाण पुलांवर दुरुस्तीची कामे सुरू होऊ शकलेली नाहीत. या संदर्भात ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना प्रतिक्रियेसाठी फोन केला. मात्र, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माजिवाडा पुलावरील मुंबई मार्गिकेचे मास्टीक पद्धतीने नुतनीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, पावसामुळे कामात अडथळे निर्माण झाले असून यामुळे हे काम थांबले आहे. पाऊस थांबताच पुन्हा काम हाती घेऊन ते पुर्ण करण्यात येईल. यानंतर इतर उड्डाण पुलांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल. ही कामे पावसाळ्यापुर्वी पुर्ण करण्यात येतील, असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.