डोंबिवली : डोंबिवली पूर्व एमआयडीसी भागातील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालय आणि एमआयडीसी कार्यालयासमोरील सीमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या बाजुला रस्त्यावरील पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी सुस्थितीमधील गटार किंवा अन्य व्यवस्था नसल्याने पाऊस सुरू झाला की या रस्त्यावर पावसाच्या पाण्याचे तळे साचते. पादचारी, विद्यार्थी या रस्त्याने जात असतील तर त्यांना पाण्यातून जाणाऱ्या वाहनांच्या अंगावर उडणाऱ्या पाण्याला सामोरे जावे लागते.
छत्रपती शिवाजी महाराज चौक (घरडा सर्कल) ते पेंढरकर महाविद्यालय दरम्यानचा रस्ता खोलगट आहे. शिवाजी महाराज चौक दरम्यान रस्ता उंचवटा, रोटरी उद्यानासमोर उतार आणि पुन्हा के. व्ही. पेंढरकर महाविद्यालय प्रवेशव्दार भागात हा रस्ता उंचवटा आहे. या दोन्ही बाजुच्या उंचवट्यामुळे पावसाचे पाणी दोन्ही बाजुने रस्त्याच्या रोटरी उद्यान, पेंढरकर महाविद्यालयासमोरील खोलगट भागात जमा होते. हे पाणी वाहून जाण्यासाठी या भागात योग्य व्यवस्था नाही. भूमिगत गटारे आहेत. त्यांची पाणी खेचून खेचणारी तोंडे गाळ, कचऱ्याने भरलेली आहेत. त्यामुळे रस्त्यावरील पावसाचे पाणी गटारात वाहून जात नाही.
हे तुंबलेले पाणी अनेक वेळा बाजुच्या एमआयडीसी कार्यालयाच्या आवारात वाहून जाते. सलग एक तास पाऊस पडला तर पेंढरकर महाविद्यालयासमोरून वाहने नेण्याचे धाडस वाहन चालक करत नाहीत. मोटारीचे इंजिन पाण्यात बुडून इंजिन बंद पडण्याची भीती चालकाला असते. पेंढरकर महाविद्यालय परिसरात व्यापारी संकुल, खाऊ, मौजमजेची दुकाने सुरू झाली आहेत. पेंढरकर महाविद्यालय ते सावित्रीबाई फुले नाट्यगृह दरम्यानच्या रस्त्यावर संध्याकाळी चार ते रात्री उशिरापर्यंत या रस्त्याच्या दुतर्फा खाऊच्या हातगाड्या लागतात. डोंबिवली शहर परिसरातील नागरिक याठिकाणी खाऊसाठी येतात.
त्यांच्या दुचाकी, मोटारी या भागात उभ्या राहतात. त्यामुळे नेहमीच या रस्त्यावर वाहतूक कोंडी असते. पालिकेच्या ई प्रभागाच्या अंतर्गत हा प्रभाग येतो. पण या प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी कधीच या भागातील फेरीवाल्यांवर कारवाई करत नसल्याच्या तक्रारी आहेत. ई प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील कामगार गेल्याच आठवड्यात कार्यालयाजवळील एका निवाऱ्यात जुगार खेळताना एका जागल्याने पकडून दिले होते. या कामगारांवर पालिकेने अद्याप कामगिरी केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पेंढकर महाविद्यालय रस्ता, एमआयडीसी कार्यालय, रोटरी गार्डन परिसरात दररोज संध्याकाळी फेरीवाल्यांची वर्दळ असते. त्यात मुसळधार पाऊस सुरू झाला की हा रस्ता जलमय होतो. त्यामुळे पादचारी, वाहन चालक यांची कोंडी होते. या जलमय रस्त्यामुळे या रस्त्याचे काम किती निकृष्ट पध्दतीने करण्यात आले आहे हेही स्पष्ट होते, असे एका बांधकाम क्षेत्रातील जाणकाराने सांगितले.