अंबरनाथ : अंबरनाथमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) झालेल्या फुटीनंतर अखेर शहराध्यक्षपदाची सूत्रे नव्या चेहऱ्याकडे सोपवण्यात आली आहेत. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के यांची अंबरनाथ शहराध्यक्षपदी निवड झाली असून, मठाण्यात झालेल्या एका विशेष कार्यक्रमात मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यांच्यापुढे शहरात पुन्हा मनसे उभी करण्याचे आव्हान असेल.
अलीकडेच अंबरनाथमधील मनसेचे माजी शहराध्यक्ष कुणाल भोईर यांच्यासह संदीप लकडे, स्वप्नील बागुल आणि अपर्णा भोईर या तीन माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करून मनसेला मोठा धक्का दिला होता. या घडामोडीनंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी बंडखोर नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये जाऊन जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निषेध व्यक्त केला होता. यात शैलेश शिर्के आघाडीवर होते. मनसेचे पदाधिकारी यांनी या बंडखोरीवर संताप व्यक्त केला होता. तर या गद्दारांना निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ असाही इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला होता.
काही दिवसांपूर्वी मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी अंबरनाथ शहरात भेट देत पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला होता. यावेळी पक्ष सोडून गेलेल्यांवर लक्ष ठेवा, त्यांनी प्रभागात केलेल्या कामांचा भ्रष्टाचार बाहेर काढा, असा आदेश जाधव यांनी दिला होता. सोबतच यांची निष्ठा कुठे गेली असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे बंडखोरी करून शिवसेनेत गेलेल्यांना धडा शिकवण्याची तयारी मनसेने केल्याचे चित्र होते. शहराचा मनसे अध्यक्षच पक्षातून बाहेर गेल्याने शहराला नवा शहर अध्यक्ष देण्याचे आव्हान पक्षापुढे होते. येत्या काही दिवसात शहर अध्यक्ष नेमला जाईल, असे अविनाश जाधव यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार अंबरनाथ शहराच्या नव्या शहर अध्यक्षाची निवड करण्यात आली आहे.
या रिक्त झालेल्या शहराध्यक्षपदासाठी शैलेश शिर्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी संघटनेत नवचैतन्य निर्माण करण्याचा संदेश दिला आहे. पक्ष सोडून गेलेल्या नगरसेवकांच्या प्रभागात नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल आणि आगामी नगरपालिका निवडणुकीत मनसे आपली ताकद दाखवून देईल, असा विश्वास यावेळी मानसैनिकांनी व्यक्त केला आहे. ठाण्यात एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या राज ठाकरे यांनी शैलेश शिर्के यांना नियुक्तीपत्र दिले. त्यानंतर शिर्के यांची अधिकृत शहर अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली.
दरम्यान, अंबरनाथमध्ये नगरपालिका निवडणुकांचे वातावरण तापू लागले असून सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. आगामी काळात स्थानिक राजकारणात मनसेची रणनीती आणि शिर्के यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.